Thursday, September 29, 2011

अपंगांच्या शिक्षणासाठी......

अपंग विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता कुशाग्र असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळेलच असे नाही. ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांना पर्यायी शिक्षणाची व्यवस्था नाही. यामुळे हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर सारले जातात. यावर मात करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांना सहज हाताळता येईल, असे तांत्रिक साहित्य त्यांना वितरित करण्यात आले आहे. यामुळे अपंग विद्यार्थी ज्ञानाचा भांडार सहजगत्या आत्मसात करीत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात १४ हजार ७०० अपंग विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुरु झाले आहे. या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपंग समावेशित शिक्षण हा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अपंगांच्या शिक्षणावर नियंत्रण ठेवले जात आहे. यावर्षी राज्यात प्रथमच यवतमाळ जिल्ह्यातील अपंग विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अशी चेअर आणि मॉडीफाय चेअर वितरित केली आहे. शाळेमध्ये आलेल्या अपंग विद्यार्थ्यांना त्यामुळे सहजपणे बसता येत आहे. चेअरला स्वतंत्र डेक्स बेंचची व्यवस्था आहे. कंबर, हात, डोके याने अधू असलेला विद्यार्थी या चेअरवर सहज बसू शकतात. त्याच्या कमजोर अवयवांवर ही खुर्ची नियंत्रण ठेवते. त्यामध्ये कमोडचे उपकरण बसवलेले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना लघवी, शौचविधी या गोष्टी जागेवरच सहजपणे करता येतात. जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर २०७ कमोड चेअर, १८७ मॉडीफाय चेअर वितरित करण्यात आल्या आहेत. या उपकरणांचा वापर करताना या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी एक स्वतंत्र कर्मचारी केअर टेकर म्हणून कार्यरत आहे.

या व्यतिरिक्त कमी दृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३२४ किट वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये संपूर्ण आधुनिक साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक स्पष्ट वाचता यावे म्हणून सीट मॅग्नीफायर देण्यात आले आहे. तर काही ओळी वाचायच्या असतील तर हँड मॅग्नीफायरचा वापर दुर्बिनीप्रमाणे करता येतो. त्याचप्रमाणे वाक्यांसाठी स्टँड मॅग्नीफायर तर लिहिताना त्रास होऊ नये म्हणून पेन होल्ड मॅग्नीफायर तयार करण्यात आले आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी आधुनिक ब्रेल कीट, कमी ऐकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पिच ट्रेनर उपकरण आहे. या उपकरणाचा वापर करताना विद्यार्थ्यांच्या डोक्याला हेडफोन राहणार आहे. यामुळे शिक्षक काय सांगतात ती गोष्ट विद्यार्थ्यांना सहज कळत असून त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याची प्रतिक्रिया अभियानाचे समन्वयक निशांत परगणे आणि संजय पातोडे यांनी व्यक्त केली.


  • अनिल आलुरकर

  • No comments:

    Post a Comment