Friday, January 13, 2012

शुद्धलेखन नियमावली 2

(२) ऱ्हस्व-दीर्घ

नियम ५ : मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावे. उदा.- कवी, मती, गती, गुरू. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा. उदा.- पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय). अपवाद :- आणि, नि.

स्पष्टीकरण- परंतु, यथामति, तथापि, इत्यादी तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावी. तसेच सामासिक शब्दातही तत्सम (ऱ्हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द पूर्वपद असताना ऱ्हस्वान्तच लिहावे. उदा.- बुद्धिवैभव, कविमन, गतिशील.

मराठी भाषेत ऱ्हस्व-दीर्घ लेखनासंबंधी काही नियम आहेत. परंतु, लिहिणाऱ्यांकडून घाईगर्दीत बऱ्याच वेळा हे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. मराठी भाषेत संस्कृत भाषेतील बरेच शब्द जसेच्या तसे स्वीकारले गेले आहेत. उदा.- कवि, मति, गति, गुरु, वस्तु, निवृत्ति इत्यादी. हे शब्द संस्कृत असून मराठीत वापरल्या जाणाऱ्या अशा मूळ संस्कृत शब्दांना 'तत्सम' शब्द म्हणतात.

असे इकारान्त व उकारान्त शब्द मराठीत वापरताना ते दीर्घान्त लिहावेत. म्हणजे 'कवि', 'वस्तु', 'नियुक्ति' हे शब्द 'कवी', 'वस्तू', 'नियुक्ती' असे लिहावेत.

व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावे. उदा.- हरी, भवभूती, मनुस्मृती, द्विबिंदु वर्गीकरण पद्धती, कृषी, कुलगुरू इत्यादी.

मराठी भाषेतील पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय) यांसारखे शब्द नियमाप्रमाणे दीर्घान्त लिहिण्यात यावेत. असे असले तरी, 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावी. तसेच मूळ संस्कृतातून आलेली 'परंतु, यथास्थिति, तथापि, अद्यापि, इति, प्रभृति, कदापि' यांसारखी (तत्सम) अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. या अपवादाप्रमाणेच सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावयाचे आहे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्त लिहावयाचे आहे. उदाहरणार्थ 'बुद्धी' हा शब्द दीर्घान्त लिहावयाचा आहे. मुळात संस्कृतमध्ये तो ऱ्हस्वान्त असल्याने 'बुद्धिचातुर्य', 'बुद्धिवैभव' असे सामासिक शब्द लिहिताना मात्र तो ऱ्हस्वान्त लिहावयाचा आहे हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. 'अणू' हा शब्द मराठीमध्ये दीर्घान्त, परंतु 'अणुशक्ती' मध्ये तो ऱ्हस्वान्त होईल. याच धर्तीवर लिहिण्यात येणारे पुढील काही शब्द अभ्यासण्यासारखे आहेत. उदा.- निवृत्तिवेतन, विधिनिषेध, वस्तुस्थिती, कृतिसमिती, स्थितिशील, प्राप्तिकर, कृषिविषयक, नियुक्तिपत्र, समितिकक्ष इत्यादी. या शब्दांमध्ये पूर्वपद असलेले संस्कृत शब्द मराठी भाषेने आत्मसात केल्यामुळे ते मराठीच्या प्रकृतीनुसार एरव्ही दीर्घान्त लिहावयाचे असले तरी समासामध्ये ते मूळ स्वरूपात योजलेले असल्यामुळे ते ऱ्हस्वान्तच लिहावे. 'षष्ट्यब्दी' हा शब्द मुळातच दीर्घान्त आहे. 'षष्ट्यब्दी' यातील घटक, षष्टि+अब्द म्हणजेच षष्ट्यब्द. त्याचे स्त्रीलिंगी रूप षष्ट्यब्दी. षष्ट्यब्दीची पूर्ती ती षष्ट्यब्दीपूर्ती. म्हणून, षष्ट्यब्दीपूर्ती या सामासिक शब्दामध्ये तो दीर्घान्तच लिहिला जाईल. त्याचप्रमाणे 'शताब्दी' हा शब्ददेखील मुळात दीर्घान्त असल्याने 'शताब्दी समारोह' या सामासिक शब्दामध्ये तो दीर्घान्तच लिहावा लागेल. 'वधूवर' या सामासिक शब्दातील पूर्वपद (म्हणजे पहिला शब्द) दीर्घान्त राहील.

साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. उदा.- शक्तिमान, गतिमान, इंदुमती, मृदुतर इत्यादी.

विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन् यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात. त्यांच्या शेवटी असलेल्या 'न्' चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. उदा.- विद्यार्थी, गुणी, प्राणी, पक्षी, मंत्री, स्वामी. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच ठेवावे. उदा.- विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, मंत्रिमंडळ, स्वामिनिष्ठा.

मराठी शब्दकोशात मात्र तत्सम (ऱ्हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द ऱ्हस्वान्त लिहिणे इष्ट ठरेल. जसे- पद्धति, अनुमति, प्रतिकृति, दृष्टि, अणु, वायु, हेतु वगैरे. परंतु असे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घान्त लिहिले पाहिजेत.

नियम ६ : (दीर्घ) ईकारान्त व ऊकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार ऱ्हस्व लिहावे. उदा.- गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू, अपवाद- नीती, भीती, रीती, कीर्ती इत्यादी दीर्घान्त झालेले तत्सम शब्द.

वरील नियमात अपवाद म्हणून दिलेल्या शब्दांप्रमाणेच प्रीती, दीप्ती, विभूती, ऊर्मी यांसारखे आणखी काही दीर्घान्त झालेले संस्कृत शब्द आहेत.

नवीन नियमाप्रमाणे हे शब्द दीर्घान्तच लिहावयाचे आहेत. परंतु त्यामुळे ते मुळात दीर्घ मानले जाण्याची शक्यता असल्यानेच त्यांचा अपवाद म्हणून स्वतंत्रपणे उल्लेख केला आहे. हे शब्द निती, भिती, रिती, किर्ती, प्रिती, दिप्ती, विभुती, उर्मी असे लिहू नयेत. या शब्दांतील उपान्त्य अक्षरे मुळात संस्कृतात जशी दीर्घ आहेत तशी दीर्घच ठेवावी.

ऊकारान्त शब्दांच्या बाबतीतही त्याच्या अलिकडचा स्वर ऱ्हस्व आढळतो. जसे : सुरू, हुतुतू, झुरू, मुरू, पुरू इत्यादी. यातील उपान्त्य स्वर ऱ्हस्व आहेत.

हाच नियम अकारान्त, एकारान्त व ओकारान्त शब्दांनाही लागू आहे. उदा.- खिळा, सुळा, पाहिले, मिळवतो इत्यादी. पण तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. उदा. ऊर्जा, ऊष्मा, पूजा, परीक्षा, प्रतीक्षा इत्यादी.

यावरून असे म्हणता येईल की, मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलिकडचा) इकार व उकार ऱ्हस्व असतो. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.

नियम ७ : अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावे. उदा.- गरीब, वकील, वीट, सून, वसूल. अपवाद : ऱ्हस्वोपान्त्य अकारान्त तत्सम शब्द. उदा.- गुण, विष, मधुर, प्रचुर.

या नियमानुसार अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार किंवा उकार दीर्घ लिहावयाचे आहेत. उदा.- ठरीव, भरीव, फकीर, हुरूप, फूल, मूल, धूळ, कूळ, भूल, चूल, सूर, पूर इत्यादी.

अपवाद म्हणून दिलेल्या शब्दांप्रमाणे मनुष्य, बहुत, विपुल, अंकुर, अद्भुत, विधुर, जटिल, मलिन, कुटिल, साहित्य, उचित, मंदिर, विहित, जीवित, शारीरिक, मानसिक इत्यादी तत्सम (मुळात संस्कृत असलेले) शब्द मात्र ऱ्हस्वोपान्त्य लिहावयाचे आहेत.

मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यत: ऱ्हस्व असतात. उदा.- भिंग, पिंप, नारिंग, गुंज, धुंद, सुंठ, खुंटी, कुंची, नि:पक्षपातीपणे, छि:, थु:, भिस्त, विस्तव, मुक्काम इत्यादी. परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदा.- चित्र, पुण्य, पुत्र, वरिष्ठ, तीक्ष्ण, पूज्य इत्यादी.

मागील नियम ३ मध्ये आपण सामान्यरूप म्हणजे काय हे पाहिले आहे. असे सामान्यरूप होताना स्वरांमध्ये जे ऱ्हस्व-दीर्घ बदल घडतात त्यासंबंधीचे विवेचन पुढील नियमात केले आहे.

नियम ८ : उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. उदा.- गरिबास, वकिलांना, सुनेला, वसुलाची, नागपुरास. अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम शब्द. उदा.- शरीरात, गीतेत, सूत्रास, जीवास.

या नियमानुसार गरीब-गरिबास, वकील-वकिलांना, सून-सुनेला, वसूल-वसुलाची, नागपूर-नागपुरास या शब्दांप्रमाणेच समजूत-समजुतीने, निवडणूक-निवडणुकीत, तपशील-तपशिलात इत्यादी शब्दांतील उपान्त्य ईकार व ऊकार एकवचनी व अनेकवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा लागतो.

परंतु शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते. उदा.-तालीम-तालमीचा, तालमीत, बेरीज-बेरजेला, बेरजेत, पाटील-पाटलाने, पाटलाचा, माणूस- माणसाला, माणसाचा, लाकूड- लाकडाने, लाकडाचा इत्यादी. या ठिकाणी वरील नियम लागत नाही. मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' विकल्पाने होतो. म्हणून जेव्हा विकल्पामुळे 'अ' आदेश करण्यात येत नाही, तेव्हा वरील नियम लागू झाल्याने उपान्त्य ई-ऊ ऱ्हस्व होतात. उदा.- परीट-परटास, परिटास.

उपान्त्य 'ई-ऊ' असलेल्या तत्सम (म्हणजेच मुळात संस्कृत असलेल्या) शब्दांच्या बाबतीतही वरील नियम लागू करता येणार नाही. उदा.- परीक्षा, वीर, गीत, दूत, सूत्र, शरीर, रीती, पूर्व, विद्यापीठ, न्यायाधीश, या शब्दांची सामान्यरूपे होताना परिक्षेत, विराने, गितात, दुतास, सुत्रातील, शरिरास, विद्यापिठाने, न्यायाधिशाचा अशी रूपे होत नाहीत. त्यांतील ई व ऊ हे स्वर दीर्घच राहतात. त्यांची परीक्षेत, वीराने, गीतात, दूतास, सूत्रातील, शरीरास, विद्यापीठाने, न्यायाधीशाचा ही योग्य रूपे होत.

इतर काही विशेष-

शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर सामान्यरूपात 'ई' च्या जागी 'य' येतो किंवा 'ऊ' च्या जागी 'व' येतो. उदा.- फाईल-फायलीत, काईल-कायलीत, देऊळ-देवळात, पाऊस-पावसात.

पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो, ('श्या' होत नाही). उदा. पैसा-पैशाचा, घसा-घशाचा, ससा-सशाचा.

पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो, (त्याचा 'ज्या' होत नाही). उदा.- मांजा-मांजाने, गांजा-गांजाचे, सांजा-सांजाची.

मधल्या अक्षरातील 'क' किंवा 'प' चे द्वित्व सामान्यरूपाच्या वेळी निघून जाते. उदा.- रक्कम-रकमेचा, तिप्पट- तिपटीने.

मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते. उदा.- अंमल-अमलात, किंमत-किमतीचा, गंमत-गमतीने, हिंमत-हिमतीने.

ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही. उदा.- गणू-गणूस, शकू-शकूस.

धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' किंवा 'वून' होईल. उदा.-चाव-चावू-चावून, लाव-लावू-लावून, जेव-जेवू-जेवून, खा-खाऊ-खाऊन, गा-गाऊ-गाऊन, पी-पिऊ-पिऊन, धू-धुऊ-धुऊन.

No comments:

Post a Comment