Sunday, January 29, 2012

सौंदर्य रत्नदुर्गचे

रत्नागिरी शहरात अनेक पर्यटनस्थळे आहे. शहराच्या परिसरातील सर्व स्थानांना भेट देण्यासाठी किमान दोन दिवस तरी आवश्यक आहेत. लोकमान्य टिळक जन्मस्थान, सावरकर स्मारक, ऐतिहासिक पतितपावन मंदिर, विठ्ठल मंदिर, भाट्येचा समुद्र किनारा, नारळ संशोधन केंद्र, मत्स्यालय, मांडवी जेट्टी यासह अनेक ठिकाणांना भेट देण्यासाठी वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरुच असते.

शहरातील मुख्य आकर्षण म्हणजे रत्नदुर्ग किल्ला. बऱ्याचदा या ऐतिहासिक किल्ल्याच्या बालेकिल्ल्यालाच भेट देऊन पर्यटक परततात. मात्र संपूर्ण किल्ल्यावर भटकंती केल्यावर विविध बाजूंनी दिसणारे समुद्रांचे सौंदर्य रत्नागिरीची भेट स्मरणीय करणारे असते. पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरलेला समुद्रकिनाऱ्यावरील हा किल्ला हा 'भगवती किल्ला' या नावानेही ओळखला जातो. बालेकिल्ल्यात भगवतीदेवीचे सुंदर मंदिर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे दीपस्तंभ आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारखा दिसतो. किल्ला सुमारे १ हजार २११ मीटर लांब आणि ९१७ मीटर रुंद असून संपूर्ण परिसर १२० एकराचा आहे. तीनही बाजूला समुद्र व किल्ल्याच्या एका बाजूला असलेले दीपगृह यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात. बालेकिल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ या वेळेत पर्यटकांसाठी बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला जातो. पेठकिल्ला भागातील पाऊलवाटेने गेल्यास भगवती आणि मिरकारवाडा बंदराचे सुंदर दृष्य दिसते. याच भागातून एकाबाजूला समुद्राच काळा किनारा आणि दुसऱ्या बाजूस पांढऱ्याशुभ्र वाळूचा पांढऱ्या किनाऱ्याचे दर्शन घडते. मुख्य रस्त्याकडे परत आल्यावर डाव्या बाजूने दिपस्तंभाकडे रस्ता जातो. वाहन दिपस्तंभापर्यंत जाते. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत दिपस्तंभावर जाऊन परिसराचे सौंदर्य न्याहाळता येते.

रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी दानशूर कै.भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्‍वर मंदिर असून मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे. मंदिराचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. परिसरातील रम्य वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा आहे. खालच्या आळीत श्री कालभैरवाचे मंदिर आहे. कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांच्या काळात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. किल्ल्यावरून उतरल्यावर निवांतपणे काही क्षण येथे घालविता येतात. रत्नागिरीतील विविध पर्यटन स्थळांना पहिल्या दिवशी भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देता येते.

रत्नागिरीहून पोमेंडीमार्गे पानवलला पोहचता येते. हे अंतर १८ किलामीटर आहे. या गावाजवळ आशियातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. पुलाची उंची ६५ मीटर असून ही भव्य निर्मिती पाहिल्यावर या निर्मितीमागे असणाऱ्या हातांविषयी मनात अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. पुलाच्या सभोवतालचा परिसरही खूप सुंदर असून जंगलातील भटकंतीचा आनंदही या भागात घेता येतो. रत्नागिरी शहरापासून ९ किलोमीटर अंतरावर पानवल गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यास ३ किलोमीटर अंतरावर डाव्याबाजूस पानवलचा रेल्वे पूल आहे. परतीच्या प्रवासात सोमेश्वर खाडीजवळील सोमश्वर मंदिर आणि तेथूनच पाच किलोमीटर अंतरावरील चिंचखरी दत्तमंदिराला भेट देता येते. 

रत्नागिरी शहरातून नाचणेमार्गे दहा किलोमीटर अंतरावर चिंचखरी येथे निसर्गरम्य परिसरात उभारलेले दत्त मंदिर आहे. गजानान महाराज बोरकर यांचे चिंचखरी हे जन्मगाव. या ठिकाणी तपोवनाची निर्मिती करून त्यांनी दत्त मंदिर उभारले आहे. मंदिराच्या बाजूला असलेला निर्मळ पाण्याचा प्रवाह आणि परिसरातील दाट वनराई यामुळे मंदिरात प्रवेश करताक्षणी प्रसन्न वाटते. श्री गुरु दत्ताची संगमरवरी मुर्ती तेवढीच देखणी आहे. राजीवाडा बंदरापासून बोटीनेदेखील चिंचखरी येथे जाण्याची सोय आहे.

चिंचखरीच्या अलिकडे डाव्या बाजूस दाट वनराईतून सोमेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. हे गाव १२ शतकातील असल्याचे सांगितले जाते. गावाच्या मध्यभागी सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. चार भागात विभागलेल्या मंदिराची वास्तू स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. दगडी तटबंदीच्या मधोमध सुंदर कौलारू मंदिर उभारले आहे.

रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर काजळीनदीच्या तीरावर हातीस गाव वसलेले आहे. गावात बाबरशेख बाबांनी गावातील लोकांना भक्तीमार्ग दाखविला. त्यांच्या महानिर्वाणानंतर गावातील जनता हिंदू असल्याने ग्रामस्थांनी इब्राहिमपट्टण येथील मुस्लिम बांधवांच्या मदतीने दफन विधी पार पाडला. तेव्हापासून दोन्ही गावातील मंडळी माघ पौर्णिमेला बाबांचा ऊरुस साजरा करतात. हा सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. ऊरुसमधील शस्त्रास्त्रांचे खेळ आणि गावातील ढोल पथकाचे खेळ डोळ्याचे पारणे फेडतात.

रत्नागिरी परिसरातील सफरीत सुंदर समुद्र किनारा सोबतीला असतो. नारळाची उंच झाडे, दाट सुरुबन यामुळे या सौंदर्यात अधिक भर पडते. इथली शुद्ध हवा आणि खास कोकणी पद्धतीच्या भोजनाची चव यामुळे येणारा पर्यटक इथे रमतो आणि सफरीचा मनमुराद आनंद घेतो.

No comments:

Post a Comment