Wednesday, January 18, 2012

मुलांसह झाडांचेही संगोपन


विद्यार्थ्यांना शिकविणे आणि वृक्षांच्या लागवडीबरोबर त्यांची जोपासना करणे ही दोन्ही एखाद्याची आवड जपण्याबरोबरच देशहिताची ठरणारी कामे आहेत. विद्यार्थी आणि वृक्ष या दोहोंच्याबाबतीत सारखाच जिव्हाळा असणाऱ्या एका शिक्षकासाठी याहून अधिक आनंददायी ते काय असणार... वाढत्या वृक्षतोडीमुळे वृक्षांचे आणि वाढत्या खासगी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे कमी होत जाणारे प्रमाण या दोन्ही चिंताजनक बाबींवर एकाच वेळी तोडगा काढून सतीश बेलोकर गुरुजींनी मुलांना शिकविण्याबरोबरच झाडेही वाढविण्याचा चंग बांधला आहे. स्वखर्चाने तब्बल १० हजार झाडांची त्यांनी परिसरात लागवड केली आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील भानखेड गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक सतीश जगदीशचंद्र बेलोकर यांनी २००९ सालापासून वृक्षमित्र प्रकल्प हाती घेतला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच याबाबतचे विविध उपक्रम यशस्वीरित्या हाताळून परिसरातील जनमानसांच्या मनावर त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविलेला होता. त्यामुळे वृक्षमित्र प्रकल्प राबविताना त्यांना सहकार्य करण्यासाठी अनेक हात आपोआपच पुढे सरसावले. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या पत्नी भारती यांच्यासह परिवारातील समेरचंद बेलोकर, विवेक बेलोकर, हेमंत बेलोकर आणि अन्य समाजसेवकांचा देखील मोठा हातभार लागला.

चिखली तालुक्यातील १५२ प्राथमिक शाळांमध्ये बेलोकर गुरुजींनी स्वखर्चाने १० हजार रोपट्यांची लागवड केली आहे. त्यापैकी आजमितीला ६ हजार ४४८ झाडे शाळेच्या आवारात मोठ्या दिमाखात उभी आहेत. याशिवाय गुरुजींनी आपल्या शेतात किसान नर्सरीच्या माध्यमातून अनेक रोपे तयार केली असून, त्यातून सातत्याने वृक्षरोपांचे वाटप व वृक्षारोपण सुरु असते.

विद्यार्थ्यांइतकेच झाडांवरही प्रेम करणाऱ्या या शिक्षकापासून परिसरातील इतरांनीही प्रेरणा घेतल्यास देशहिताच्या एका मोठ्या कार्याची ही सुरूवात ठरू शकेल, यात शंका नाही.

No comments:

Post a Comment