Wednesday, January 18, 2012

हिरवंगार एक स्वप्नं

आधी सगळे मला घाबरत होते. पण आता मी त्यांना घाबरतो. एकेकाळचा जंगलचा राजा मी पण आता आपलीच शिकार होवू नये म्हणून लपून बसतो. हिरव्यागर्द रानात राहणारा, सुंदर, घनदाट झाडांतून फिरणारा मी आता विरळ झुडपातून जातो. ना उरली हिरवाई, ना उरले वृक्ष, ना सृजन, ना उरलं माझं भोजन... ही कैफियत मांडली आहे शासनाच्या 'वाघ वाचवा' या मोहिमेतील वाघाने. ही कैफियत घेवून हा वाघ सर्वदूर पोहोचला आहे. त्याला या कामी मदत केली आहे ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेने. तो आपल्याला त्याला वाचवायचे पर्यायाने निसर्ग वाचवायचे आवाहन करतो आहे तेव्हा त्याला आपण पर्यावरणाचं रक्षण करण्याचा निश्चय करून मदत करायला हवी आहे. . 

प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करताना पर्यावरणाचं आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येक सजीवाचं रक्षण आपण जर केलं नाही तर त्याचा सर्वात मोठा फटका आपल्यालाच बसणार आहे. पर्यावरणाच रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत ही दिनदर्शिकाही त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. पर्यावरणाचं जतन केलं तरच आपलं भवितव्य सुरक्षित राहू शकेल असा संदेश देणारी जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट च्या विद्यार्थ्यांनी बनवलेली बारा पोस्टर्स हे या कॅलेंडरचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.

निर्सगाचं देणं आपलं लेणं समजून त्याचं रक्षण कराल अशी सदिच्छा बाळगून महाराष्ट्र टाईम्सच्या मदतीने ही दिनदर्शिका सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाचं रक्षण करणं ही वर्तमानाची गरज तर भविष्याची जबाबदारी आहे.त्यासाठी निश्चय करू या. असा संदेश देणारं हिरवंगार एक स्वप्नं एक प्रयत्न ही दिनदर्शिका आहे. 

ही दिनदर्शिका बनविताना निर्सगसंवर्धनासाठी शासन स्तरावर विविध दिवस साजरे केले जातात. या दिवसांना विचारात घेवूनच त्या त्या महिन्याची संकल्पना बनविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रेखाटन आणि घोषवाक्यांचा योग्य असा मेळ घालण्यात आला आहे.

यामध्ये जानेवारी महिन्यात नवी झाडं लावू या हवा शुध्द करू या हा संकल्प करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात जागतिक पाणथळ भूमी दिन असतो म्हणून पाणी वाचवा हा संदेश दिला आहे. यासाठी त्यांनी आधी पाण्याची उपेक्षा नंतर थेंबाची प्रतीक्षा या घोषवाक्यासह दिला आहे. 

मार्च महिन्यामध्ये जागतिक वन दिन, जल दिन आणि हवामान दिन आहे. या सर्वांचा पाण्याशी संबंध असल्याने थेंबे थेंबे तळे साचे पाण्याविना कोणी ना वाचे या आशयासह जमीन व पाणी यांचा प्रतिकात्मक अंगठयावर वापर केला आहे. 

एप्रिल महिन्यामध्ये वसुंधरा दिवस असल्याने वृक्ष वाचवा निसर्ग वाचवा हा संदेश हिरवा निसर्ग त्याला प्रदूषणाचा संसर्ग या आशयासह प्रतिकात्मक रेखाटला आहे. 

मे महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन आहे. तो आशय सागराचा प्राण तळमळला, तळमळला सागरा या घोषवाक्याने दिला आहे. 

जून महिन्यात पर्यावरण दिन असल्याने वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जुलै मध्ये जागतिक लोकसंख्या दिन असल्याने लोकसंख्या राहील नियंत्रणात तरच देश भरारी घेईल आकाशात असा संदेश, ऑगस्ट मध्ये राजीव गांधी अक्षय उर्जा दिन असल्याने आजच वाचवा उद्याच्या भवितव्यासाठी असा वीज वाचवा देणारा संदेश आहे. 
सप्टेंबर मध्ये जागतिक ओझोन व हरित ग्राहक दिन असल्याने प्रदूषण थांबवा असा संदेश देणारे धुराची गर्दी तिथे वसुंधरेला सर्दी तर ऑक्टोबर मध्ये जागतिक वन्यजीव सप्ताह, विश्व प्राणी कल्याण दिन आणि आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती नियंत्रण दिन आहे त्यामुळे वाघ वाचवा हा संदेश दिला आहे. 

नोव्हेंबर मध्ये इंधनच उरलं नाही तर गाडीचा काय उपयोग तर डिसेंबर मध्ये राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन आहे. तेव्हा निसर्ग वाचवा जीवन वाचवा असा संदेश दिला आहे. 

सुंदर छपाई, आकर्षक ग्लॉसी कागद, माहितीपूर्ण मजकुराचा खजिना आणि विशेष म्हणजे सामाजिक प्रबोधन करणारा आशय यामुळे ही दिनदर्शिका सर्वांना हवीहवीशी वाटेल हे नक्की. 

  • मनिषा पिंगळे 
  • No comments:

    Post a Comment