Tuesday, January 3, 2012

गोव्यातील चपातीच अर्थकारण

गोवा हे जागतिक पर्यटन क्षेत्र. गोमंतकीय जनतेचे मुख्य अन्न भात व मासे. पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींना विविध खाद्य पदार्थ हवे असतात. पूर्वी गोव्यातील लोकांच्या मनावर पोर्तुगीज संस्कार होते. पाव हे नाश्त्याचे अन्न. चहापाव, भाजीपाव, मिरचीभजी पाव. उडपीवासीयांनी गोव्यातच हॉटेल व्यवसाय काबीज केल्यावर उत्तप्पा, वडे, दाळवडे, दहीवडे, इडली-सांबार, डोसा, कॉन्टीनेंटल खाणे सगळीकडे मिळू लागले. परंतु पोळी (चपाती) भाजी हे मुख्यत्वे सर्वांना आवडते. मात्र गोव्यात पावाशिवाय काही मिळत नाही. अशी परि‍स्थिती पंधराएक वर्षापूर्वी होती. 

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटकच्या काही भागातील लोकांना चपाती हवीच असते. यावर मार्ग काढण्यासाठी चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी चपातीचा व्यवसाय सुरु केला.त्यांनी २००० मध्ये फ्लॅट विकत घेतला, तेव्हा बँकेचे कर्ज घेतले. त्याची परतफेड त्यांच्या पतीच्या पगारातून होत होती. आणि हातात जेमतेम पगार येत होता. त्यात त्यांचं भागत नव्हतं. मग पर्याय शोधायला सुरुवात झाली.

या व्यवसायातील त्यांच्या यशाविषयी त्या म्हणाल्या, आमच्या बिल्डींगच्या खाली किराणा मालाचे दुकान आहे. एके दिवशी मी दुकान मालकाला विचारले की, इथे कुठे आसपास चपात्या पुरवणारा माणूस आहे, तो दुकानातून गव्हाचे पीठ नेतो. त्याची ओळख मला करुन द्या मी असं म्हणत असतानाचा पाठीमागून आवाज आला 'वहिनी मागे वळून पहा तो मीच आहे.' मी त्याच्याकडे पाहताच त्याने त्याची ओळख करुन दिली. तो म्हणाला 'माझेनाव काटे मी नागपूरचा आहे. मी तुम्हाला शंभर चपात्यांचे पीठ देतो. तेल देतो ते घेऊन जा आणि उद्या शंभर चपात्या करुन द्या.' 

त्या १०० चपात्या (पोळी) मी दुसऱ्या दिवशी करून दिल्या त्या दिवसापासून ते आजतागायत या चपात्यांचे अग्निहोत्र चालू आहे. मी सुरुवातीला शंभर नंतर दोनशे अस करत करत मीच माझ्या चपात्या करण्याची क्षमता वाढवत गेले. एका दिवसाला १००० ते १५०० चपाती करत गेले. कारण जेवढ्या मी चपात्या (पोळ्या) करेन तेवढी मला अर्थप्राप्ती होत असे. आठ वर्षापूर्वी १०० चपाती केल्या तर तो ३० रु. द्यायचा. तर अशा प्रकारे चपात्याचा प्रवास सुरु झाला. 

नंतर माझ घर आर्थिक दृष्ट्या स्थिरावत चाललं होत. तेव्हा मला वाटायला लागला माझ्या सारख्या अनेक महिला आहेत आणि त्या चपात्यावाल्याला चपात्या करण्यासाठी महिलांची गरज होती. अल्पावधीतच १० ते १५ महिला चपात्या करण्यासाठी तयार झाल्या. आज ५० महिला या व्यवसायावर अवलंबून आहेत. स्वत:च घर सांभाळून त्या अर्थार्जन करत आहेत. स्वत:च्या कमावलेल्या पैशावर उज्वल भवितव्याचे स्वप्न पहात आहेत.

रोज सकाळी ८:३० वाजता १५ हजार चपाती (पोळी) तालेगावातून बाहेर पडते. म्हणजे आमची सकाळ ही पहाटे ३:३० ला सुरु होते. प्रत्येक महिला आपआपल्या घरी चपात्या बनवितात. या चपात्या त्या त्या भागात नेऊन देण्यासाठी माणसे नेमली आहेत. आज हा व्यवसाय खूप फोफावला आहे की, अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील माझी चपाती जाते. 

शंभर महिलांच्या साथीने संपूर्ण गोव्याला चपाती पुरविली जाते. महाराष्ट्रातून गोव्यात स्थिर व्हायला मला अशी चपाती कामी आली. तसा माझा बचतगटही कामी आला. दामिनी महिला स्वयंसहाय्यता बचतगट, तालेगांव (पणजी) अध्यक्ष म्हणून मला याचा अभिमान आहे. सौ. चित्रा प्रकाश क्षीरसागर त्यांच्या यशाची कहानी सांगत होत्या.. समोर चपातीचा ढीग वाढत होता. 

  • डॉ.ग.व.मुळे
  • No comments:

    Post a Comment