Sunday, January 29, 2012

राजपथावर महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता

दगडावर कलाकृती बनविण्याची आपली हजारो वर्षाची पंरपरा आहे. याची साक्ष देत अजिंठा-वेरूळ, एलिफंटा, कार्ला अश्या अनेक लेण्या गौरवपूर्ण सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. यातील अजिंठा-वेरूळ या लेण्या अतिशय भव्य-दिव्य आहेत. या लेण्या बघण्यासाठी देशी विदेशी दर्दी पर्यटांची गर्दी असीम अश्या महाराष्ट्रात होत असते. याची दखल जागतिक स्थळावरही घेण्यात आली म्हणूनच या स्थळाला जागतिक पर्यटकाचा दर्जा युनेस्कोतर्फे देण्यात आला आहे. 

औद्योगिक महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र, संत परपंरा लाभलेले महाराष्ट्र, समाज सुधारकांचे महाराष्ट्र, सामाजिक महाराष्ट्र, तसेच ऐतिहासिक महाराष्ट्र,अशी वैविध्यपुर्ण महाराष्ट्राची ओळख आहे. सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य महाराष्ट्र आहे. उच्च सांस्कृतिक ठेवा, नैसर्गिक आश्चर्य, ऐतिहासिक वास्तूंनी भरपूर असा सांस्कृतिक दृष्टया असीम महाराष्ट्र आहे. 

महाराष्ट्र शब्दाचा शब्द: अर्थ म्हणजे महान असे राज्य, विशाल असे राज्य, अशा विशाल राज्यात पर्यटक तसेच पर्यटनाला मोठा वाव आहे. पुरातन गुफा, मंदिर, सुंदर-स्वच्छ समुद्री किनारे, पुरातन किल्ले आणि वास्तू, वैभवशाली वनसंपदा, वन्यजीव सपंदा, तीर्थस्थल, सण-उत्सव, कला आणि संस्कृतिचा गौरवपूर्ण ठेवा महाराष्ट्राला लाभलेला आहे.

असीम महाराष्ट्र हे घोषवाक्य घेऊन २०११-२०१२ हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या ६२ व्या गणराज्य दिनाच्या पथसंचलनात राजपथावर वेरूळ येथील कैलाश लेणी देखाव्यासह शिव तांडव नृत्य सादर केले जाणार आहे.

कैलास लेणे जगविख्यात आहे हे शिवमंदिर इ.स.च्या ८ व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या राजवटीत खोदलेले होते. गिरीशिल्पात हे कोरीव काम हे अव्दितीय आहे. याचे अद्भुत शिल्पसौंदर्य पाहणार्‍याला विस्मित करते. भक्ती, श्रद्धा, दिव्यत्व आणि भव्यत्व या सर्वांचे ते प्रतीकच आहे !

हे संपूर्ण मंदिर एकाच खडकात खोदलेले असले तरी, डोंगरापासून वेगळे केलेले आहे. त्याच्या भोवती २७६ इंच लांब व १५४ इंच रूंद असा प्राकार असून, मागील बाजूला १०७ इंच उंचीचा पहाड ऊभा दिसतो. प्राकाराभोवती पाषाणाची नैसर्गिक भिंत असून, दर्शनी भिंतीत अर्धस्तंभांनी विभागलेली देवकोष्टे आहेत. त्यात दिवपाल, शिव, विष्णु, इंद्र-इंद्राणी, महिषासुरमर्दिनी नृसिंह,वराह, त्रिविक्रम, ब्रम्हा, इ. देवतांची भव्य शिल्पे आहेत. जगात हे एकमेव उदाहरण आहे .

अशा प्रख्यात शिल्पाला चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य यावर्षी राजपथावर सादर करीत आहे. यासोबतच यावेळी शिवाचे तांडव नृत्य सादर केले जाणार आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाने ठरविलेल्या या विषयाला मुर्त स्वरूप प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई हे देत आहे. नृत्य दिग्दर्शक विनोद हासल, ग्राफिक्स ॲण्ड आर्ट अजित खोत शासनाकडून तज्ञ म्हणून नरेंद्र विचारे आहेत. तांडव नृत्याकरीता ठाण्यातील २० कलाकारांचा असा एकूण चमू दिल्लीत दाखल झालेला आहे. 

सांस्कृतिक संचालनालयाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी, संचालक आशुतोष घोरपडे, सहसंचालक मीनल जोगळेकर, कार्यक्रम अधिकारी ए.एस जगताप यांनी या चित्ररथाला राजपथावर सादर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

महाराष्ट्राने राष्ट्राचा अभिमान राखण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. यंदाच्या चित्ररथाचा विषय त्यातीलच एक रचनात्मक पाऊल आहे. असीम महाराष्ट्राचा एक नमुना म्हटल्यास अनुचित ठरणार नाही.

No comments:

Post a Comment