Thursday, January 12, 2012

वाचकांचा ग्रंथोत्सव !

राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उस्मानाबाद येथे २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथोत्सवाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. वाचकांनी तीन दिवसांमध्ये पाच लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या पुस्तकांची खरेदी केली. ग्रंथोत्सवात आयोजित प्रत्येक कार्यक्रमात वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले. काही वर्षापूर्वी येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलना नंतर प्रथमच या स्वरुपाचा कार्यक्रम झाला, अशी दाद जाणकारांनी दिली तर येथील व्यवस्था आणि ग्रंथोत्सवाला प्रतिसाद मिळावा म्हणून केलेले नियोजन उल्लेखनीय होते,असे सहभागी विक्रेत्यांनी लेखी अभिप्रायात नमूद केले. एकुणच हा ग्रंथोत्सव एका जिल्हा माहिती कार्यालयापूरता मर्यादित राहिला नाही, तो वाचकांचा ग्रंथोत्सव ठरला आणि पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा ग्रंथोत्सवाचा हेतू पुर्णत: सफल झाला. 


पहिला दिवस

ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे दि. २९ डिसेंबरला उस्मानाबाद येथील श्रीतुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. येथील थंडी लक्षात घेवून इयत्ता ९ वीतील तसेच अध्यापक महाविद्यालयातील एकूण ३०० विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत, अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात एक हजारावर विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. दिंडीच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या हाती घोषणाफलक दिले जावू लागले, तेव्हा ते घेण्यासाठी विद्यार्थ्यांत जणू स्पर्धाच लागली. दिंडीत जमलेले विद्यार्थी म्हणजे उदघाटन समारंभाचे हमखास श्रोते, हे समीकरण आपण योग्य मानायचे नाही आणि औपचारिक उदघाटनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना सक्तीने थांबवून घ्यावयाचे नाही, असे निश्चित केले होते. अगदी ठरल्याप्रमाणे १० वाजता दिंडी विसर्जित केली. त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मग प्रदर्शनाचे उदघाटन होण्याची वाटही न पाहता प्रदर्शन पाहण्याचा आनंद लुटला. 

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी ग्रंथोत्सवाचे औपचारिक उदघाटन केले. अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागाचे माहिती संचालक, बी. एन. गवारी हे होते. समृध्द जीवनासाठी पुस्तकांशी मैत्री हवी, अशा सूत्रमय शब्दात डॉ. गेडाम यांनी पुस्तकांचे व जीवनाचे नाते स्पष्ट केले. 

उस्मानाबादमध्ये जिल्हा शासकीय ग्रंथालय नव्हते, मात्र ही उणीव दूर करण्यात आली असून आता नव्याने कार्यान्वित करण्यात आलेले जिल्हा शासकीय ग्रंथालय परिपूर्ण केले जाईल एवढेच नव्हे, तर त्याच्या इमारतीसाठी शासकीय जागा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या ग्रंथालयात कोणती पुस्तके असावीत हे वाचकांनीच सूचवावे कारण ग्रंथालय त्यांच्यासाठीच आहे. या डॉ.गेडाम यांच्या बोलण्याला उस्मानाबादकरांनी भरभरुन दाद दिली. 

उदघाटनानंतर हळू-हळू प्रदर्शनाला गर्दी जमू लागली. सायंकाळी निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होते. सुरुवातीला सभागृहात अगदीच मोजके श्रोते होते. अवघ्या १५ मिनीटात सभागृह भरुन गेले. सर्वश्री श. मा. पाटील, राजेंद्र अत्रे, बालाजी इंगळे, डी. के. शेख, सुभाष चव्हाण, उत्तम लोकरे, पंडित कांबळे, शेखर गिरी , प्रा. हनुमंत काळे, देवीदास पाटील आणि रविंद्र केसकर यांनी सादर केलेल्या प्रत्येक कवितेला रसिकांनी दाद दिली. विनोदी आणि उपहासात्मक कविता दाद घेवून गेल्या. यात आश्चर्य नव्हते, पण गंभीर आशय आणि गंभीर मांडणी असलेल्या कविताही रसिकांना मनापासून आवडल्या, हे या संमेलनात पदोपदी जाणवत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अधीक्षक अभियंता राठोड यांच्यासह विविध अधिकारी या संमेलनाला रसिक श्रोते म्हणून हजर होते. 

साडेआठच्या ठोक्याला काव्यसंध्या संपली, तेव्हा हा कार्यक्रम अजुन अर्धा तास तरी चालावयास हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. या मैफलीनंतर सगळ्यांचीच पाऊले प्रदर्शनाकडे वळली आणि प्रदर्शनाच्या मांडवात एकच गर्दी झाली. 

दुसरा दिवस

ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमाला वृत्तपत्रांनी व्यापक प्रसिध्दी दिली. विविध वाहिन्या आणि स्थानिक वाहिनीनेही सविस्तर वृत्तांत दाखवला. त्याचा परिणाम असा झाला की, दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता विक्रेते दुसर्‍या दिवसाची मांडामांड करत होते आणि त्यांच्यासमोर वाचक उभे होते. या दिवशी सायंकाळी ख्यातनाम साहित्यीक प्रा. भास्कर चंदनशिव यांची सर्वश्री बालाजी इंगळे, नारायण पवार व राजेंद्र अत्रे यांनी प्रकट मुलाखत घेतली. या संवादालाही श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. भोवतीच्या माणसाच्या वेदना हीच आपल्या साहित्याची प्रेरणा आहे, असे नमूद करुन प्रा. चंदनशिव म्हणाले की, आज गावगाडा बदलत चालला आहे, तो समजावून घेत नव्या लेखकाने चिंतन केले पाहिजे, तरच त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटेल. 

तिसरा दिवस

नव्या पिढीतील मुला मुलींवर शुध्दलेखन व लेखन पध्दतीचा संस्कार व्हावा, या हेतूने ग्रंथोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी शुध्द लेखन तसेच लेखन पध्दती संदर्भात प्रा. प्रशांत चौधरी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २ तास चाललेल्या या कार्यशाळेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले. 

दुपारी ३ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचा औपचारिक समारोप झाला. यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेलाही सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्याचा प्रतिसाद लाभला. रात्री ९ वाजताही मंडपात वाचक आणि विक्रेते होतेच. शेवटी मंडपवाल्या कंत्राटदाराने त्यांना आवरते घेण्याची विनंती केली. परतणार्‍या विक्रेत्यांना निरोप देताना येथील विक्रीबाबत विचारले तेव्हा त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वांची एकत्रित विक्री पाच लाखावर गेली. पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचा पुरावा म्हणजे हा पाच लाखांचा आकडा होय. वाचक आहेत, पुस्तके त्यांच्यापर्यंत घेवून जा आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांचे आवडीचे पुस्तक निवडण्याची संधी दया, हाच या ग्रंथोत्सवातून मिळालेला धडा आहे. 

ग्रंथोत्सवाला मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. बी. एन. देशमुख, उस्मानाबादचे प्रधान जिल्हा व सत्र न्या. शशिकांत कुलकर्णी, प्रसिध्द लेखिका लक्ष्मी कमल गेडाम आदींनी भेट दिली.

एकूणच गेल्या वर्षातील शेवटचे तीन दिवस उस्मानाबादकर वाचकांच्या मनात घर करुन गेले. 


  • राधाकृष्ण मुळी 
  • No comments:

    Post a Comment