Thursday, January 12, 2012

चोमाचे थिरकते अस्तित्व

शिवराम कारंथ हे नाव केवळ कन्नडच नव्हे, तर भारतीय साहित्यात फार मोठे आहे. त्यांच्या निवडक पुस्तकांचा अनुवाद मराठीत झाला आहे. ‘चोमन दुडी’ या त्यांच्या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘चोमा महार’ या नावाने कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. अनुवादक आहेत श्यामलता काकडे. 

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उपेक्षित महार जातीत जन्मलेला चोमा तसा एक क्षुद्र जीव. संपकय्यांचा वंशपरंपरागत महार असलेला चोमा एक प्रकारचा त्यांचा वेठबिगारच. कधी काळी जवळच्या गावातल्या मळेवाल्याकडून घेतलेल्या चार-पाच रुपये कर्जाची रक्कम चोमाला वीस रुपयांत फेडावी लागते. त्यासाठी आपली दोन मुले त्याला त्या मळ्यात राबायला पाठवावी लागतात. कन्नड साहित्यिक के. शिवराम कारंथ यांच्या ‘चोमन दुडी’ कादंबरीचा नायक हा अंधारयुगात जगणाऱ्यांचा प्रतिनिधी आहे. जणू दुसऱ्या पद्धतीचे जगणे त्याला जगताच येणार नाही, म्हणून ही मंडळी फक्त अन्यायाचे ओझे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या डोक्यावर वागवताहेत! 

चोम वयस्क आहे, पण त्याच्या मनात एक स्वप्न दडले आहे, ते म्हणजे त्याला जमीन कसायची आहे. मात्र मारी या महार जातीतल्या चोमाला तिथल्या रिवाजानुसार जमीन कसायचा हक्कच नाही. चोमाच्या हाती कडाडणारी डवरी (दुडी) हा त्याच्या अंगभूत वादनकलेचा साक्षीदार आहे. सुखदुःखात त्याची साथ देणारी डवरीच काय ती आहे. चोमा झपाटून डवरी वाजवतो आणि भयाण शांततेला भेदून टाकत डवरीचा ढम्-ढम्, ढक्-ढक् आवाज सर्वदूर पोचतो. डवरी हा चोमाचा विरंगुळा आहे, विसावा आहे आणि मनातला संताप व्यक्त करण्याची हक्काची जागाही आहे. मजुरीसाठी गावोगाव जाणारे आणि कुठल्या ना कुठल्या निमित्ताने क्षुल्लक कर्जात अडकणारे हे लोक मग त्यातून बाहेर पडूच शकत नाहीत. चोमाच्या कुटुंबाची कथा काही वेगळी नाही. 

त्याची दोन मुले मळ्यावर राबायला जातात. त्यापैकी एक ख्रिश्चन पोरीच्या प्रेमात पडून धर्म बदलून दुरावतो. तर दुसरा कष्टामुळे आजारी पडतो आणि देवदेवस्कीच्या उपचारांमुळे मृत्युमुखी पडतो. कोवळ्या वयातल्या धाकट्या दोन मुलांना मग मळ्यावर पाठवण्यापेक्षा तो बेळ्ळी या मुलीला एका मुलासोबत पाठवतो. बेळ्ळी समजूतदार असली तरी तिचे तारुण्य तिला मोहात पाडते आणि मुकादमाशी संबंध ठेवून ती कर्ज लवकर फेडते. त्यानंतर लवकरच ती गावात परतते, पण तिथे दुर्दैव तिची पाठ सोडत नाही. तिला मोहापासून मुक्ती मिळत नाही. चोमाला याबाबत समजते तेव्हा तो हबकून जातो. आपणही ख्रिस्ती व्हावे अशी इच्छा मनात उभारून येत असताना, जिद्दीने तिला बाजूला सारून चोमा परत फिरतो तेव्हाच त्याला मुलीबद्दल समजून धक्का बसतो. त्याच्या हातातली डवरीसुद्धा या धक्क्यामुळे जणू मुकी होते. 

कारंथांनी यात केलेले चोमाच्या मुलीचे बेळ्ळीचे चित्रण वाचताना मन हळहळते. कादंबरीत वावरते ती चोमाची मुलगी, भावांची बहीण, मुकादमाची भोगदासी बनून. तिला स्वतःचे अस्तित्वच नाही. वेठबिगारीचे भीषण स्वरूप नाइलाजाने मान्य करून घेणारी, चोमाची आणि त्याच्या मुलांची पिढी शोषितांचे प्रतिनिधित्व करते. ‘चोमन दुडी’ ही फक्त वेठबिगारीची कथा नाही. ती तर चोमाच्या मनातील चिवट स्वप्नांची कथा आहे. कधीकाळी साधासा जमिनीचा तुकडा सरपंचाकडून मिळेल या आशेने बैलांची जोडी हौसेने पाळणारा चोमा इलाज उरत नाही तेव्हाच त्यांना मालकाच्या शेतावर नांगरणीसाठी पाठवतो. त्याचे मनोविश्व एवढेसे आहे, पण त्याची छोटीशी इच्छाही पुरी होत नाही. म्हणूनच चोमाचे दुःख फार मोठेही आहे. ते त्याच्या थिरकत्या हातांतून व्यक्त होते, तेव्हा डवरीचा आवाज दूरवर पोचतो. या लहानश्या कादंबरीतून के. शिवराम कारंथ यांनी उभा केलेला अवकाशही दिशांना भेदणारा आहे. चोमाच्या डवरीतून उमटणाऱ्या आवाजासारखा!

नंदिनी आत्मसिध्द

No comments:

Post a Comment