Sunday, January 15, 2012

प्रगतीची साईज्‍योत

हातसडीचा तांदूळ, सेंद्रिय शेतीचा वापर करून पिकविलेले ओला हरभरा, भगर, शेंगदाणे फुटाणे,शेवया,लोणची, मुरांबे, पिठल भाकरी ठेचा,उदबत्‍या, धूप, कपडे, सौदर्यप्रसाधने, भांडी, देवपुजेचे साहित्‍य,वॉलपेपर अशा एक ना अनेक वस्‍तूंचे स्‍टॉल. खरेदी करण्यासाठी नागरिकांची उडालेली झुंबड साक्ष देत होती महिलांच्या प्रगतीची, सक्षमीकरणाची. 

स्‍वयंसहाय्यता बचत गटांच्‍या माध्‍यमातून उत्‍पादित मालास ग्रामीण भागातील कारा‍गीरांना बाजारपेठ उपलब्‍ध करून देण्यात आली आहे. सुवर्ण जयंती ग्रामस्‍वरोजगार योजनेतंर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्‍या वस्‍तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्‍सवांचे राज्‍यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येते. या महोत्‍सवांना चांगला प्रतिसाद मिळतो. यामुळे या गटांचा आत्मविश्वासही वाढला आहे. 

अहमदनगर येथे भरविलेल्‍या नाशिक विभागीय प्रदर्शन व विक्री, सक्षम महिला महोत्‍सव व साई ज्‍योती स्‍वयंसहाय्यता यात्रेत सुमारे १ कोटी ९८ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल व साडेसहा लाखावर ग्राहकांनी दिलेली भेट हे या यात्रेचे प्रचंड यशच म्‍हणावे लागेल .या सात दिवसीय प्रदर्शनास नाशिक विभागाचे महसूल आयुक्‍त जयंत गायकवाड यानी प्रत्‍यक्ष भेट देवून या प्रदर्शनास मिळालेल्‍या प्रतिसादाबद्दल संयोजकांना व बचत गटांना धन्‍यवाद दिले. तसेच जर्मनीतील मथया, मायकल यांनी भेट देऊन बचतगटाच्‍या महिलांचे कौतुक केले. 

महिला बचतगटही महिलांच्‍या सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. ग्रामीण भागात बचतगटाच्‍या माध्‍यमातून विविध सुंदर, सुबक वस्‍तू बनविल्‍या जातात. या वस्‍तू आज मोठमोठया मॉल मध्‍येही मिळत नाहीत म्‍हणून त्‍यांना हक्‍काची, कायमस्‍वरुपी बाजारपेठ उपलब्‍ध झाली आहे. यामुळे महिलांची अर्थिक उन्‍नती होवून त्‍या स्‍वतः बरोबर आपल्‍या कुटुंबाचाही सर्वागीण विकास साधत आहेत. 

ग्रामीण भागातील कारागीराच्‍या अंगी अनेक विविध उपजत कलागुण असतात. त्‍याच्या आधारे पारंपारिक साधन-सामग्री मधूनच ते आकर्षक वस्‍तू तयार करतात आणि त्‍याची विक्रीही करतात. या प्रदर्शनांमुळे त्‍यांच्‍या मालास वस्‍तुंना शहरी भागात चांगली बाजारपेठ उपलब्‍ध झाली आहे. हे बचत गट विविध कलाकुसरीच्या वस्‍तूंबरोबरच खाद्यपदार्थ, मसाले, कपडे, सौदर्यप्रसाधने आयुर्वेदिक औषधे आदी तयार करीत असतात. याचा दर्जा, गुणवत्‍ताही चांगली आहे. साई ज्‍योती स्‍वयंसहायता यात्रेत झालेली वस्‍तूंची विक्री व ग्राहकांनी दिलेल्‍या भेटीची संख्‍या लक्षात घेता या बचत गटांच्‍या सदस्‍यांना प्रोत्‍साहन मिळते आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे हे निश्चित. 

  • दिलीप गवळी 
  • 1 comment:

    1. Turmeric pickle बचत गटाचा नं मीळेल का

      ReplyDelete