Friday, January 20, 2012

लाईफ लाईन...

जळगाव जिल्हयातील चोपडा, यावल व रावेर तालुक्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठया प्रमाणावर आहे तसेच हा भाग सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी येतो त्यामुळे आदिवासी समाजासाठी व इतर सर्वसामान्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम थोडसं अवघडच असते परंतु जिल्हा प्रशासनाकडून सर्वसामान्यांसाठी असलेल्या सर्व योजनांची पूर्तता तालुक्यात नियमितपणे केली जात असल्याचं चित्र आहे. या भागाचा दौरा करण्याची संधी मला नुकतीच मिळाली त्यावेळी शासन आदिवासी व दुर्गम भागात पुरवित असलेल्या विविध विकासात्मक योजनांची कार्यवाही पाहण्यात आली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दिनांक १० ते १३ जानेवारी या कालावधीत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या भागातील आदिवासी व ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविण्याकरिता चोपडा उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती शासनाने केलेली आहे.

आरोग्य शिबिरास जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निरुपमा डांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत आयोजित शिबिराचा लाभ घेणाऱ्‍या रुग्णांची पाहणी केली तसेच त्यांनी रुग्णांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्याप्रमाणेच शिबिरात मिळालेल्या आरोग्य विषयक सुविधांबद्दल आनंद व्यक्त केला.

शिबीरात ९६४ बाह्य व आंतररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया तसेच १२१ रुग्णाची दंतचिकित्सा करण्यात आल्याची माहिती डॉ.किरण पाटील यांनी दिली. ज्या आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांकरीता शिबिराचे आयोजन केले होते त्याचा लाभ मिळत असल्याचं मला रुग्णांच्या व शस्त्रक्रियेच्या संख्येवरुन जाणवत होते.

रुग्णांच्या चेहऱ्‍यावरील समाधानाचे भाव शासनाच्या ग्रामीण आरोग्य अभियानाचं यश आहे. 

आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून डॉ.किरण पाटील, डॉ.उदयसिंग पाटील, डॉ.माधुरी पाटील व शासकीय रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिबीरात आलेल्या रुग्णांवर औषधोपचार केले या सर्वांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नारायण राठोड यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विभागातील हे सर्व घटक एकत्र आल्याने आरोग्य शिबीर खऱ्‍या अर्थाने यशस्वी झाल्याचं वाटत होते.

आरोग्य शिबीरात उपजिल्हा रुग्णालयाने ग्रामीण भागातील लोकांमध्ये हिवताप, क्षयरोग, सिकलसेम आदि रोगांविषयी जनजागृती व्हावी म्हणून माहिती देणारे प्रदर्शनी स्टॉल लावलेले होते. यामधून लोकांमध्ये संबंधित रोगाच्या लक्षणांविषयी प्राथमिक स्तरावर जनजागृती करणाऱ्‍या शासकीय रुग्णालयाचा उद्देश खऱ्‍या अर्थानं कौतुकास्पद वाटला. त्यातील स्त्रीभृणहत्येविषयी माहिती देणारा स्टॉल खरोखरच महत्वपूर्ण व लक्षणीय ठरला. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत चोपडा येथे घेण्यात आलेले आरोग्य शिबीर म्हणजे या भागातील गरजू गोरगरीब आदिवासी व ग्रामीण बांधवासाठी एक लाईफ लाईन ठरले असल्याचेच चित्र माझ्यासमोर तेथून बाहेर पडताना उभं राहिलं. 

  • सुनिल सोनटक्के 
  • No comments:

    Post a Comment