Tuesday, January 10, 2012

ऊसाला पर्याय अद्रक शेतीचा

ऊसाची शेती ही सधन शेती म्हणून ओळखली जाते. सध्या या पिकावर अशाश्वत भावाचे आलेले संकट पाहिले तर ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र ऊसाला पर्याय म्हणून आता आल्याची (अद्रक) शेती हा पर्याय पुढे येत असून सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील वाकाव येथे अनिल मगर या वाणिज्य शाखेतील पदवीधर शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

स्वत:च्या शेतीमध्ये 12 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केलेली असताना देखील आल्याच्या पिकाकडे वळण्याचे कारण सांगताना मगर म्हणाले की, ऊसाच्या लागवडीपासून विजेची समस्या, मजुरांची टंचाई या समस्यांना सामोरे जात असताना तो कारखान्यात जाईपर्यंत जीवात जीव नसायचा. शिवाय, टनेज वाढविण्यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासना करावी लागते आणि भाव किती द्यायचा, हे कारखान्याच्या हातात! त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे, असा विचार मनात आला. पंढरपूर तालुक्यात कान्हापुरी परिसरात मोठ्या प्रमाणात आल्याचे पीक घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे जाऊन या पिकाची माहिती घेतली आणि सुरुवातीला दोन एकर क्षेत्रात आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार 18 जून रोजी दोन एकरमध्ये ही लागवड केली. एकरी 1 टन बेणे लागले. बेण्यासाठी एक लाख रुपये, शेणखतासाठी 50 हजार रुपये, ड्रीपसाठी 52 हजार रुपये व इतर खर्च 50 हजार असा एकूण 2 लाख 52 हजार रुपये खर्च आला. या अद्रक पिकात होल्कन या जातीच्या मिरचीचे आंतरपीक घेतले. यातून 50 हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. दोन एकरात 45 टन आल्याचे खात्रीशीर उत्पादन मिळण्याचा दावा मगर यांनी केला. अँप्सा-एटी मुळे भरघोस उत्पादन वाढीचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

माझी ऊस शेती असतानाही एक वेगळा प्रयोग आणि ऊसाला पर्याय म्हणून अद्रक शेतीकडे वळलो असल्याचे श्री.मगर म्हणाले. सध्या शेतकरी विविध कारणांनी मोठ्या संकटात आहे. त्यातल्या त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याची स्थिती म्हणावी तितकी बरी नाही. ऊस शेती ऐवजी शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय निवडावा, त्यासाठी हा प्रयोग केला असून बाजार भावाचा अंदाज पाहून आल्याचे हे पीक विक्रीसाठी पाठवू शकतो. त्यामुळे आल्याची शेती ही शाश्वत व फायद्याची ठरणारी शेती असल्याचे निरीक्षण मगर यांनी नोंदविले. मगर यांच्या या वेगळ्या प्रयोगापासून शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी इतकेच......


  • फारुख बागवान

  • No comments:

    Post a Comment