Sunday, January 29, 2012

उमलू द्या कळ्यांना.

बाप म्हणे लेकी तु गं साखरेचं पोतं. . .
परि तुझ्या नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतंना दिसत आहे. 

राज्यातील १९९१ ते २०११ लिंग गुणोत्तराचे प्रमाण
(एक हजार पुरुषांमागे महिला )
१९९१- २००१ - २०११
एकूण ९३४ - ९२२ - ९२५
ग्रामीण ९७२ - ९६० - ९४८
शहरी ८७५ - ८७३ - ८९९

राज्यातील १९९१ ते २०११ लिंग गुणोत्तराचे प्रमाण
(शून्य ते सहा वयोगट एक हजार मुलांमागे मुली )
१९९१ - २००१ - २०११
एकूण ९४६ - ९१३ - ८८३
ग्रामीण ९५३ - ९१६ - ८८०
शहरी ९३४ - ९०८ - ८८८

या आकडेवारीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, १९९१ ते २०११ या कालावधीत महिलांच्या प्रमाणात दर हजार पुरुषांमागे ९३४ वरून ९२५ इतकी घट झाली आहे तर शून्य ते सहा या वयोगटात याच कालावधीत १ हजार मुलांमागे ९४६ वरून ८८३ इतकी मुलींची लक्षणीय घट झाली आहे.
महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात टॉपचे पाच जिल्हे
अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग
१ रत्नागिरी १,१२३ - १,१४६ - १,०१३
२ सिंधुदूर्ग १,०३७ - १,०४६ - ९८१
३ गोंदिया ९९६ - ९९८ - ९८४
४ सातारा ९८६ - ९९३ - ९५५
५ भंडारा ९८४ - ९८४ - ९८२

महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे पाच जिल्हे
अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग
१ मुंबई ८३८- - ८३८
२ मुंबई उपनगर ८५७ - - ८५७
३ ठाणे ८८० - ९५४ - ८५९
४ पुणे ९१० - ९२७ - ८९९
५ बीड ९१२ - ९०९ - ९२६

महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात टॉपचे पाच जिल्हे (शून्य ते सहा वयोगट )
अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग
१ गडचिरोली ९५६ - ९६१ - ९१८
२ चंद्रपूर ९४५ - ९५८ - ९१९
३ गोंदिया ९४४ - ९४७ - ९२७
४ रत्नागिरी ९४० - ९४२ - ९२८
५ भंडारा ९३९ - ९४४ - ९१५
महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे पाच जिल्हे शून्य ते सहा वयोगट )
अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग
१ बीड ८०१ - ७८९ - ८४८
२ जळगाव ८२९ - ८३० - ८२७
३ अहमदनगर ८३९ - ८३७ - ८४८
४ बुलढाणा ८४२ - ८४१ - ८४७
५ कोल्हापूर ८४५ - ८४२ - ८५२

ही आकडेवारी पाहिली तर देश आणि राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण लक्षात येते. याचा समिक्षात्मक अभ्यास केला तर पुरुषांच्या तुलनते महिलांचे आणि शून्य ते सहा वयोगटात मुलांच्या तुलनेत मुलींचे दर हजारी प्रमाण कमी होत असून ती चिंतेची बाब आहे.सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढू द्यायची नसेल तर सावधान ! आत्ताच या गोष्टीला गांभीर्याने घेऊन पाऊले उचलण्याची गरज आहे.

असं का? याचं उत्तर शोधण्याची आता खरी वेळ आलीय. खरचं मुला-मुलीत फरक असतो? कुठल्या क्षेत्रात मुली, मुलांच्या तुलनेत मागे आहेत? आज किती आई-वडिल मुलांपेक्षा मुलींकडे जास्त राहातात किंवा किती मुली आई वडिलांचा म्हतारपणचा आधार झाल्या आहेत हे जर पाहिलं तर अनेक लोकांकडे, कुटुंबाकडे याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील. 

बचतगटातील महिलांपासून अवकाशात भरारी घेणाऱ्या अंतराळवीरांपर्यंत मुलींनी विविध क्षेत्रात मिळवलेलं यश पाहिले तर मुला-मुलीत करण्यात येत असलेला भेदभाव किती तकलादू आहे हे लक्षात येतं. सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे आता सगळ्यांना पटु लागलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलेंपासून अलिकडच्या काळात मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांच्यापर्यंत महिलांचे काम पाहिले तर महिलांनी कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक विकास आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी दिलेलं योगदान लक्षवेधी ठरतं.

अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वंयसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. यामध्ये पहिलं ताट तिला, चला मुलींचे स्वागत करू या, नकोशी होतेय हवीशी, राखीसाठी बहिण हवी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचीही राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. परंतु सर्व प्रश्न कायद्याने सुटतात असं अजिबात नाही. त्यासाठी गरज आहे ती मानसिकता बदलाची. 

गावात नदी आणि घरात मुलगी असायलाच हवी अशी जुनी जाणती माणसं नेहमी म्हणायची. नदी हे जीवनाचं, समृद्धीचं प्रतिक तर घरात मुलगी असणं हे हासू-आसू, फॅशन,कला-साहित्य-संस्कृती, नाविन्य, नात्यातल्या जिव्हाळ्याचा रेशीमबंध जिवंत असल्याचं प्रतीक. म्हणूनच तर घरात मुलगी झाली तर लई झाल्या लेकी नको म्हणू बापा, उडूनिया जाईल तुझ्या चिमण्यांचा ताफा. . . असं सांगून ही माणसं मुलीच्या जन्माचं स्वागत करायला लावायची. आज पुन्हा हीच संस्कृती, हाच विचार समाजमनात रुजवायचा असून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय. . . कळ्यांना अवेळी खुडण्याआधी पूर्ण उमलू द्यायचंय. राष्ट्रीय बालिकादिनाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया !

No comments:

Post a Comment