Tuesday, January 10, 2012

बचतगटाच्या फवारणी पंपाला वाढती मागणी

महिलांचे स्वयंसहायता गट राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. सातारा जिल्ह्यात महिलांच्या बचतगटाबरोबरच आता पुरुषांचेही बचतगट निर्माण होऊ लागले आहेत. तरुणांनीही बचतगटाच्या माध्यमातून शेतीविकासाची मोठी झेप घेतली आहे. जिद्द आणि परिश्रमाद्वारे वाई तालुक्यातील बावधन येथील श्री स्वामी समर्थ कृषी स्वयंसहायता बचतगटाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नेहमीपेक्षा वेगळे आणि सर्वांना उपयोगी ठरेल असे काहीतरी करण्याचा विचार या समूहाने केला. विचारविनिमयानंतर या समूहाने फिरते एच.टी.पी. फवारणी पंप तयार करण्याचे ठरविले. सर्वांनी जिद्दीने प्रयत्न केल्याने त्यांनी असा पंप तयार करून सभासदांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली.

बावधन परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस, हळद, भाजीपाला, फळबाग व फुलाच्या शेतीत अनेक यशस्वी प्रयोग करुन शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा इतिहास नोंदविला आहे. त्यामुळे हे गाव राज्यात कृषी क्षेत्रात प्रयोगशील गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील होतकरू तरूण एकत्र आले आणि त्यांनी श्री स्वामी समर्थ कृषी स्वयंसहायता बचत गटाची स्थापना करुन तरुणांमध्ये नवा विश्वास निर्माण करुन दाखविला आहे.

श्री स्वामी समर्थ कृषी स्वयंसहायता बचतगटामध्ये बावधन गावातील चौदा तरुण सदस्य असून, नारायण पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली समूहाचे काम गतीने सुरु आहे. या समूहाने मासिक बचतीतून जमा झालेल्या रकमेतून शेतीविकासासाठी विविध साहित्यसामग्री खरेदी करून फिरते फवारणी यंत्र तयार केले. त्यामुळे शेती कामात भेडसावणारा कामगार उपलब्धतेचा अडथळा दूर होण्यासही मदत झाली आहे. बावधनसह परिसरातील शेतकऱ्यांचे फिरते एच.टी.पी. फवारणी पंप हे एक नवे आकर्षण बनले आहे.

या फिरत्या फवारणी पंपाचा वापर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी केला जात आहे. या पंपाद्वारे एका दिवसात ६ ते ८ एकर क्षेत्राची फवारणी करणे शेतकऱ्यांना आता शक्य झाले आहे. या नाविण्यपूर्ण एच.टी.पी. फवारणी पंपामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेची, श्रमाची आणि पैशाची बचत होऊ लागली आहे.

बावधन येथील या समूहाने तयार केलेल्या फवारणी पंपास परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली आहे. समूहातील सर्व सभासदांच्या साथीने भविष्यकाळात शेतीस उपयोगी आधुनिक अवजारे उपलब्ध करण्याचा मानस समूहाचे अध्यक्ष नारायण पिसाळ, उपाध्यक्ष कालिदास जगताप, सचिव नितीन पिसाळ यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment