Saturday, January 21, 2012

स्वखर्चातून बनतोय शेतरस्ता

शेतीच्या विकासात जर कुठला सर्वात मोठा अडचणीचा प्रश्न असेल तर तो म्हणजे शेतरस्त्यांचा. गावागावात शेत रस्त्यांमुळे वाद उभे राहिलेली अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. वर्षानुवर्षे सुरु असलेली ही अडचण सोडविण्यासाठी बुलडाणा तालुक्यातील माळवंडी गावात एक नवा प्रयोग पुढे आला आहे. येथील शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत शेतरस्ता बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

माळवंडी ते मातला हा शेतरस्ता कागदोपत्री मोठा असला तरी येथे प्रत्यक्षात बैलगाडी जाईल एवढीच वाट राहिली आहे. वर्षानुवर्षे या रस्त्यावरुन जाताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. दरवर्षी खड्डे भरावे लागायचे. यासाठी खर्चही मोठा व्हायचा. 

अशातच या गावचे सुपुत्र तथा लातूरचे विद्यमान जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी शेतरस्ते मोकळे करण्यासाठी केलेल्या कामापासून प्रेरणा घेऊन माळवंडी येथील शेतकऱ्यांनी मातलापर्यंतचा हा शेतरस्ता मोकळा करण्याचे ठरविले. यासाठी शेतकऱ्यांनी चर्चा करून नियोजन केले. सुभाष बोराडे, बाबूराव चव्हाण, अनिल सोनोने, राजू रायके, भागाजी कड, दत्ता चव्हाण, मोहन चव्हाण, राजाराम सोनवणे, साहेबराव चव्हाण, राजाराम पवार, दामदास माळी, भगवान सोनोने, कचरु जाधव, पुंजाजी जाधव, कडूबा कड, माधव सोनोने, सुरेश चव्हाण, संजय कड, अण्णा आमले, नामदेव शिंदे, भीमराव पवार, अभय कुळकर्णी, गजानन कड, प्रा.डी.आर.माळी अशा अनेकांनी पुढाकार घेऊन हा निर्णय अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. 

सर्वांनाच उपयोगी पडणाऱ्या या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च्या पदरचे पैसे उभारण्याचा संकल्प केला. यातून जवळपास ७५ ते ८० हजार रुपये जुळतील, असा विश्वास आला. अखेरीस या कामाचा मुहूर्त साधून या रस्त्यावर जेसीबीच्या माध्यमातून खोदाई सुरु झाली आहे. या माध्यमातून किमान दोन किलोमिटरचा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. प्रत्येकाने पुढाकार घेऊन रस्त्याच्या अवतीभोवती असलेले अतिक्रमण काढू देण्यास संमती दिली आहे. यातूनच हा एक अभिनव प्रयोग सिद्धीस जात आहे. 

शेतरस्त्यांची अशी समस्या अनेक गावागावांमधून आहे. अशा गावातील शेतकऱ्यांनी माळवंडीतील शेतकऱ्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवल्यास अनेक वर्षे वादात सापडलेले रस्ते तर मोकळे होतीलच पण त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल. 

No comments:

Post a Comment