Saturday, April 7, 2012

कथा हिरव्या यशाची


'प्रयत्न करणाऱ्यांची शेती आहे. मेहनत करीत रहा ती भरभरून देईल' रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील लक्ष्मण कुंभार यांच्या शेतीला भेट दिल्यावर त्यांच्या या बोलण्यातील सत्यता पटते. आपल्या चार एकरच्या शेतीत भाजीपाला आणि कलिंगडाचे भरघोस उत्पन्न घेताना त्यांनी वर्षाचे उत्पन्न तीन लाखांपर्यंत पोहोचविले आहे.

कुंभार यांच्या कुटुंबात एकूण पाच भाऊ. त्यामुळे वडिलोपार्जित अल्पशा जमिनीतून प्रत्येकाच्या वाट्याला केवळ दोन गुंठे जमीन आली. मात्र लक्ष्मण कुंभार यांनी चुलत्याची २६ वर्ष सेवा केल्याने त्याचे फळ जमिनीच्या रुपात त्यांना मिळाले. घर चालविण्यासाठी त्यांनी प्रारंभी घराची कामे केली. मात्र त्यात ते फार काळ रमले नाही. ते गावाकडे आले. कोतळूक गावात नदीकिनारची उतारावरची जमीन त्यांच्याकडे आली. जमिनीला शेतीयोग्य करण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या कष्टाला फळही लवकर मिळाले. भाताचे उत्पन्न चांगले येऊ लागले.

दरम्यानच्या काळात कृषी विभागामार्फत चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक शेतात केल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल केला. पुढील वर्षाच्या पावसाळ्यात त्याच पद्धतीने लागवड केली. त्यामुळे त्यांना प्रतिगुंठा १२० किलो तांदळाचे उत्पादन मिळाले. कृषी सहाय्यक जाधव यांनी प्रत्येक आठवड्यात पिकाला भेट दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा चांगला लाभ झाल्याचे कुंभार सांगतात. त्याचबरोबर गावातीलच जानू भेकरे या अनुभवी शेतकऱ्याचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी कलिंगड लागवडीकडे लक्ष घातले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी शेतीकामातील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. सतत नवे प्रयोग हेच त्यांच्या यशाचे रहस्य असावे. कृषी विभागाने आत्मा योजनेतून उपलब्ध करून दिलेले बियाणे आणि युरिया ब्रिकेट्स तसेच वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन त्यांना उपयुक्त ठरले आहे. यावर्षी कलिंगडाचे एकूण २० ते २२ टन पीक येईल, असा विश्वास कुंभार यांनी व्यक्त केला. त्यांनी शेतात कलिंगडासोबतच भाजीपाल्याची लागवड केली आहे. कमी श्रमात चांगले उत्पन्न मिळत असल्याने कोबी, मिरची, मुळा, वांगी अशी विविध पिके ते घेतात. यावर्षी प्रथमच भेंडी लागवड करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

शेताच्या बाजूला असलेल्या नदीच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घेताना कुंभार यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पिकांना खते देण्याची यांत्रिक पद्धत उपयोगात आणल्याने कमी खर्चात अधिक परिणाम साधला गेल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनानंतर विक्रीचे योग्य व्यवस्थापन करताना त्यांनी ठराविक व्यापाऱ्यांशी करार केले आहेत. त्यामुळे ठरल्या वेळेत माल बाजारात जाण्यास अडचण निर्माण होत नाही.

केवळ कष्ट घेण्याची तयारी आणि नव्या गोष्टी करण्यात रस घेतल्यामुळे हे यश मिळाल्याचे लक्ष्मण कुंभार तेवढ्याच नम्रतेने सांगतात. जमिनीकडे जेवढे लक्ष दिले तेवढ्याच प्रमाणात उत्पन्न मिळेल, हा नव्या पिढीला संदेश देताना आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाला देण्याची उदारतादेखील ते दाखवतात. त्यांच्या प्रयोगशिलतेविषयी जाणून घेण्यासाठी इतरही शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. त्यांना अधिक चांगली माहिती देता यावी यासाठी सतत नवे प्रयोग करण्यात रस घेताना शेती फायद्यात कशी आणावी हेदेखील त्यांनी दाखवून दिले आहे.

  • डॉ.किरण मोघे

  • No comments:

    Post a Comment