Wednesday, April 4, 2012

बचतगटामुळे फुलतेय जीवन

आजच्या काळात मुलगा आणि मुलगी हा भेद नष्ट होत चालला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने काम करू लागली आहे. पूर्वी इतरांवर अवलंबून असणारी स्त्री आता स्वत:च्या पायावर उभी राहिली असून शहरांच्या तुलनेत मागे राहिलेल्या ग्रामीण भागातील महिला देखील आता बचतगटाच्या माध्यमातून स्वत:चे कर्तृत्व दाखवून देऊ लागल्या आहेत.

नंदुरबार तालुक्यातील वावद येथे अनेक बचतगटांची स्थापना झाली आहे. परंतु त्यातील मुक्ताई बचतगट हा लक्षवेधक ठरला आहे. या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व सदस्य या विधवा महिला आहेत.

या गावातील विधवा महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. बचतगटाची चळवळ सुरू झाली आणि वावद गावातील १२ विधवा महिलांनी मुक्ताई बचतगट स्थापन करुन स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा मानस केला. हे काम अगदीच सोपे नव्हते. परंतु या कामी त्यांना दामिनी सीएमआरसीच्या अध्यक्षांची मोलाची साथ मिळत आहे. गटातील सर्व महिलांना गावातील लोकांनी देखील मदत करण्याचे ठरविले आहे.

मुक्ताईच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या महिलांसाठी बचतगटाचे कार्य नवीन असल्याने गटाला माविममार्फत विशेष प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. भविष्यात माविम व सीएमआरसीमार्फत उद्योग-व्यवसायाबाबतचे प्रशिक्षण देऊन त्या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली जाणार आहे. वावद येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.

पती हयात नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यांवर ओझे बनून न राहता वावद गावातील विधवा महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा मार्ग शोधला आहे. या माध्यमातून त्या स्वत:चा संसार पुन्हा उभा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुढे टाकण्यासाठी त्यांनी उचललेल्या या पावलाला भक्कम आधार देण्यासाठी समाज देखील तयार झाला आहे. हाच आदर्श इतर गावांतील विधवा महिलांना देखील नक्कीच बळ देऊन जाईल, यात शंका नाही.


  • मेघ:श्याम महाले

  • No comments:

    Post a Comment