Saturday, April 14, 2012

महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान

राज्यातील ग्रामीण भागातील जल व भूमी संधारण, पडीक जमीन विकास, वृक्ष लागवड इत्यादी नैसर्गिक साधन संपत्तीत सुधारणा व वाढ करण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या लोकसहभागाद्वारे राबविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान १ मे २००२ पासून सुरु करण्यात आले आहे. अभियानाची अंमलबजावणी अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने पूर्वी अस्तित्वात असलेली बक्षीस येाजना सुधारित करून राबविण्यात येणार आहे.

जलसंधारण कार्यक्रमाला गती देण्यासाठी अभियान काळात केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्राम पंचायत, सेवाभावी संस्था यांना पुरस्कार देण्यासाठी १८ जून २००३ च्या शासन निर्णयान्वये बक्षिस योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिल २००३ ते ३१ मार्च २००४ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या संस्था व व्यक्ती यांना पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता.

अभियानातंर्गत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याकरीता बक्षीस योजनेचा समावेश असलेले अभियान १ एप्रिल २०११ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती विचारात घेता जलसंवर्धनाच्या कार्यक्रमास अनन्यसाधारण महत्व आहे. या कार्यक्रमाद्वारे पाण्याच्या उपलब्धतेकरीता जलसंधारणाचे महत्व लक्षात घेवून महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानातंर्गत अनेक गावात हिरीरिने लोक सहभागाद्वारे कामे होवून उत्कृष्टपणे मृद व जलसंधारणाची कामे गेल्या अनेक वर्षापासून झाली आहेत.

१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या अशासकीय संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना पुरस्कार देवून गौरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या बक्षीस योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहीत नमुन्यात आवश्यक माहिती भरुन तालुका कृषी अधिकारी/गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावयाचे आहेत. या योजनेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार संबंधित गावामध्ये अभियानांतर्गत झालेल्या कामाचे मूल्यमापन करुन त्यानुसार त्या गावाला गुण द्यावयाचे आहेत.

बक्षीस योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींनी/संस्थांनी तालुका कृषी अधिकारी/गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या ३० एप्रिल २०१२ पर्यंत नोंदणी करावी. बक्षीस येाजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. नाव नोंदणी १० एप्रिल ते ३० एप्रिल २०१२ या कालावधीत करावयाची आहे.

झालेल्या कामांचे मूल्यमापन १ मे ते २० मे २०१२ या कालावधीत करण्यात येणार आहे. मूल्यमापनाचा अंतिम अहवाल २५ मे २०१२ रोजी करण्यात येणार आहे. पुरस्कार निवडीसाठी जिल्हास्तरावर बैठक ३० मे २०१२ रोजी, विभागस्तरावरील ५ जून, राज्यस्तरावरील २० जून रोजी होणार आहे. राज्यस्तरावरील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम १ जुलै २०१२ रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमीसंधारण अभियानांतर्गत बक्षीस योजनेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे मूल्यमापनासाठी जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती, विभागस्तरीय निवड समिती आणि राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर तीन ग्रामपंचायतींना ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार अशी तीन बक्षिसे, दोन पंचायत समितींना प्रथम क्रमांक १ लाख, द्वितीय क्रमांक ७५ हजार रुपये व एका स्वयंसेवी संस्थेला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

विभागस्तरावर ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांक १ लाख, द्वितीय क्रमांक ७५ हजार, तृतीय क्रमांक ५० हजार रुपये, पंचायत समितीसाठी प्रथम क्रमांक १ लाख ५० हजार, द्वितीय क्रमांक १ लाख व एका जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकासाठी ३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

राज्यस्तरावर ग्रामपंचायतीसाठी प्रथम क्रमांक २ लाख, द्वितीय क्रमांक १ लाख ५० हजार, तृतीय क्रमांक १ लाख रुपये, पंचायत समितीसाठी प्रथम क्रमांक ३ लाख, द्वितीय क्रमांक २ लाख, तृतीय क्रमांक १ लाख ५० हजार रुपये तर जिल्हा परिषद प्रथम क्रमांक ५ लाख, द्वितीय क्रमांक ३ लाख, तृतीय क्रमांकासाठी २ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment