Friday, April 13, 2012

मोजणी जमिनीची…

पैसा गुंतविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जमीन विकत घेणे. म्हणतात ना, सोन्याची विक्री हातोहात होते तर जमिनीची विक्री रातोरात होते. सांगायचे तात्पर्य हेच की, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून स्वत:च्या मालकीची जमीन असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझी जमीन किती आणि कुठपर्यंत आहे ? याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यासाठी आपण जमिनीची मोजणी करत असतो.

मंत्रालयात काम करत असताना महसूल विभागाच्या कामांमध्ये याविषयी खूप सारे ऐकून होते. अलिकडच्या काळात महसूल विभागाने आपल्या भूमीसंदर्भातील सर्व अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचेही काम हाती घेतले आहे. भूमापकांना प्रशिक्षण देण्यासाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. याबाबत मला खूप उत्सुकता होती म्हणून ही मोजणी कशी होते हे जाणून घेतले.

आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जित जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. त्यानुसार जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशावर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत १.५०० या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी १.१००० या परिमाणात तयार होते.

त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते. या मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते.

यापुढे जेव्हा आपण जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीचा अर्ज कराल तेव्हा, या लेखात सांगितलेल्या पायऱ्या पूर्ण झाल्या की आपली नोंदणी पूर्ण झाली असे समजून आपण निश्चिंत व्हावे.


  • अर्चना शंभरकर

  • 2 comments:

    1. महाशय नमस्कार प्रत्यक्ष मोजणीचे वेळी जर टेबल न लावता प्रत्यक्ष रेखांकन न करता केवळ टेप लावून हद्द निश्चिती केली असेल तर त्याबद्दल तक्रार कोणत्या नियमाखाली करावी किती दिवसात करावी याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती डॉक्टर बडे

      ReplyDelete
    2. माझी वैयक्तिक तक्रार आहे माझा इमेल आहे dr.shrikantvbade@gmail.com

      ReplyDelete