Sunday, April 1, 2012

श्रमदानातून मिटला पाणीप्रश्न

गावकऱ्यांनी मनावर घेतले तर गावातील प्रश्न कसे चुटकीसरशी निकाली निघतात याचे सुंदर उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातील मन्याळी या गावातील नागरिकांनी घालून दिले आहे. हे गाव पाणी टंचाईने त्रस्त होते. गावकऱ्यांनी लोकवर्गणी आणि श्रमदानाने गावातील ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढली आहे. आता गावात मुबलक पाणी उपलब्ध आहे.

आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे हे गाव नेहमीच चर्चेत राहायचे. त्यातच अगदी कमी खर्चात गावकऱ्यांनी नळ योजना गावात सुरू केल्याने गाव पुन्हा चर्चेत आले आहे. गावात पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत होती. टंचाईग्रस्त गाव म्हणून शासन या गावाला विहीर अधिग्रहणासाठी दरवर्षी ४० ते ५० हजार रूपये देत होते. पण यावर्षी मात्र गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न निवारण्याचा निर्णय घेतला.

गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी गावकऱ्यांनी गावालगत श्रमदानातून विहीर खोदली होती. लोकवर्गणीतून दोन लाख रूपये जमा करून विहिरीचे बांधकाम केले. या विहिरीला मुबलक पाणी साठा झाला. परंतु नळजोडणीसाठी मदत मिळाली नसल्याने गावकऱ्यांनीच लोकवर्गणीतून नळयोजना करण्याचा संकल्प केला. गावकऱ्यांनी दोनच दिवसात ४० हजार रूपये लोकवर्गणी जमा केली. या लोकवर्गणीतून विहिरीवरून मोटरपंपाने पाणी गावात आणले. चौकाचौकात पाईपास तोट्या बसवून प्रत्येक घरी पाणी पुरविण्यात आले. कमीत कमी खर्चात नळयोजना सुरू झाली. लोकांना पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. गावात मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे इंदिरा आवास योजनेच्या घरकुल बांधकामासही गती मिळाली आहे. आज प्रत्येक कुटुंबास दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा होत आहे. इतर गावाने मन्याळी गावाचा आदर्श घेतला तर पाणीटंचाई दुर होण्यासाठी मदत होईल, इतके चांगले काम या गावाने केले आहे.

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे, वीज कंपनीचे दुय्यम अभियंता एम.आर.नागरे, सरपंच अर्चना काळबांडे, पांडुरंग महाजन, भगवान काळबांडे, अरूण वाढवे, राजू गवळे, किसन काळबांडे, गौतम दवणे आदी गावातील नागरीकांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment