Wednesday, April 4, 2012

एक सूर एक ताल

दहा हजार विद्यार्थी आणि एक हजार शिक्षक यांच्या मुखातून राष्ट्रगीत ऐकण्याची संधी मला नुकतीच खामगाव येथे मिळाली. निमित्त होते ते एक सूर एक ताल कार्यक्रमाचे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद अध्यक्षा वर्षा वनारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश ठुबे, शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन २८ मार्च रोजी करण्यात आले होते.

एक सूर एक ताल कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी एकसाथ राष्ट्रगीत सादर करुन उपस्थितांना रखरखत्या उन्हातही गारव्याची जाणीव करून दिली. देशभक्ती गीत, बालगीत, समूहगान, मुकनाटिका अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दहा हजार विद्यार्थ्यांनी एकाच मंडपाखाली राष्ट्रीय एकात्मता जोपासून समता, बंधुत्व आणि एकतेचा संदेश दिला.

बुलडाण्याच्या भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी “ गाणी गाऊ ” हे समूहगीत सादर केले तर शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऐ प्यारी भारत माँ हे देशभक्तीपर समूहगीत गायले. त्यानंतर बोराखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण केले. लाटावर लाटा आल्या रे, हम सब एक है, आली आली पारु शाळेला, देश हमारा हमको प्यारा अशा समूहगीताने खामगावचे तालुका क्रीडा संकुल दणाणून निघाले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली. एका सुरात गात असलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांचे मधुर आवाज परिसरात चैतन्य निर्माण करीत होते.
खामगावचे आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा परिषद अध्यक्षा वर्षा वनारे, उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, अतिरीक्त पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे आदि मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनापासून शिक्षणाचे धडे घेऊन संपूर्ण राज्य साक्षर करण्याचा निराधार करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. शिक्षणासाठी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले जातील असे मान्यवरांनी सांगितले.
१ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती केवळ परीक्षा केंद्रित न राहता ती व्यक्तिमत्व विकास केंद्रित करण्यात येत आहे.

एक सूर एक ताल या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची संधी मिळाली. या कार्यक्रमात जिल्हापरिषद, नगरपरिषद आणि खामगाव शहरातील शाळेतील एकूण १० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षिततेसाठी १० विद्यार्थ्यांच्या मागे त्याच शाळेतील एक शिक्षक या प्रमाणे एकूण १ हजार शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे ठिकाणी आणण्यासाठी परिवहन महामंडळाच्या सुमारे १०० बस आणि तितक्याच खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था केली होती. वाढते तापमान लक्षात घेता विद्यार्थ्याच्या आरोग्य सुरक्षेसाठी दोन वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थी पहिल्यांदाच एकत्र आले. देशभक्ती, सांप्रदायिक भावना, पर्यावरण, एकता, मुलींचे शिक्षण इत्यादी बाबत प्रसार झाला आणि विद्यार्थ्यांत राष्ट्रीय भावना जोपासली गेली.


  • सुधाकर शहाणे

  • No comments:

    Post a Comment