Saturday, April 14, 2012

विकासाची पंचसूत्री

'गाव करी ते राव काय करी' ही म्हण खरी ठरवत अक्कलकोट तालुक्यातील मौजे गुरववाडीच्या गावक-यांनी हरियाली पाणलोट विकास कार्यक्रमातून विकासाची गुढी उभारली आहे. कधीकाळी दुष्काळग्रस्त आणि टँकरवर अवलंबून असणारे हे गाव आता हिरवेगार आणि पाणीसंपन्न गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. शासकीय योजनेचा लाभ घेतल्यास ग्रामविकास चांगल्या प्रकारे होतो हे यावरुन सिध्द झाले आहे.

ग्रामीण भागात शेतीवर उपजिवीका असणा-या वर्गासाठी पाण्याच्या उपलब्धतेत वाढ होण्यासाठी, जमिनीची उत्पादकता वाढण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे हरियाली पाणलोट विकासाची योजना या गावात राबविण्यात आली. तसा अक्कलकोट तालुका हा ७० दुष्काळी भाग असलेला तालुका आहे. येथील एक तृतीयांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. कोरडवाहू पीक पध्दती असल्याने लहरी पावसावर शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे जनावरांच्या चा-याचा आणि पाण्याचा प्रश्न येथे सतत भेडसावतो.

त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी मौजे गुरवाडीच्या गावक-यांनी जिल्हा ग्रामीण विकास योजनेच्या हरियाली पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची मदत घेतली. गावातील अल्प पाण्याचे स्त्रोत, पडीक जमिनीची अधिक व्याप्ती या सर्वांचा विचार करुन पाणलोट विकास कार्यक्रमाची ६०० हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरवात करण्यात आली. १,१२६ लोकसंख्येच्या या गावात या योजनेतंर्गत आजतागायत ५०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. १२८ लहान दगडी बांधासह प्रत्येकी २ माती नाला बांध आणि शेततळे बांधण्यात आले आहेत.

पाणलोटाच्या कामांमुळे पडणा-या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवला गेला. त्यामुळे भूजल पातळी वाढली. परिणामी प्रत्येक विहिरीतील पाणीपातळी ८ ते १२ फूटांनी वाढली आहे. बोअरवेल्सची संख्या ४५ वरुन ५७ झाली. पाणी मिळाल्याने गावातील पीक पध्दतीत बदल झाला. फळ लागवड क्षेत्र ५ वरुन २१.६५ वर पोहचले. चाराटंचाई कमी झाली. पूर्वी केवळ २२.४९ टन चारा मिळत होता तिथे आता ६१.४४ टन मिळू लागला. त्यामुळे दुभत्या जनावरांची संख्या ५२७ वरुन ९५५ इतकी झाली. दुग्धव्यवसाय वाढीस लागून आर्थिक सुबत्ता आली आहे. गाव हिरवेगार दिसू लागले. गावातील टँकर बंद झाला. त्याची आजपर्यंत गरज भासली नाही. यंदा पावसाळयात कमी पाऊस होऊनही आज उन्हाळयात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळयातही शेते हिरवीगार आहेत. हरियाली पाणलोट योजनेमुळे गावाला नवसंजीवनी मिळाली असून गावात आज नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कु-हाडबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रीचे पालन काटेकोरपणे केल्या जात आहे. आज गावाचा संपूर्ण कायापालट झाला असून गावक-यांची विकासाची गुढी डौलाने फडकत आहे.


  • रुपाली गोरे

  • No comments:

    Post a Comment