Tuesday, April 10, 2012

लाडलीचा लळा...

ती आली.. तिला पाहिलं.. आणि तिने जिंकलं.... ती आली होती राज्याच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात..निमित्त होतं जागतिक आरोग्य दिनाचं. यातली ती म्हणजे गोड चेहेऱ्याची निरागस बाहुली लाडली! पाळण्यात ऐटीत बसलेल्या या लाडलीनं मुलींच्या जन्माचे स्वागत करा.. मुलींचा अभिमान बाळगा..असा संदेश दिला..मंत्रालयात दिवसभर ती मात्र चर्चेचा विषय बनली होती.

राज्यातल्या विविध भागात झालेल्या आरोग्य प्रदर्शनात तिची उपस्थिती ही हमखास असतेच आणि तीही गर्दी खेचणारी असते.. सगळ्यांनीच या बाहुलीचे कौतुक केले आहे..

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांच्यामार्फत आरोग्य जाण या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्याच्या अन्य संदेशांसोबतच मुलीच्या जन्माचे स्वागत करा असा संदेश देण्यासाठी हा पाळणा व ही लाडली बाहुली तयार करण्यात आली आहे.

जन्मानंतर पहिलं नात असतं ते पाळण्याशी हाच धागा पकडून मुलींच्या जन्माच्या स्वागताच्या संदेशासाठी पाळणा आणि बाहुली वापरण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाचं याच्याशी दृढ नातं पूर्वापार असतं, या पाळण्यात हसले, रडले, पहुडले आणि वाढले अनेक छोटे जीव..या पाळण्यानं कधी केला नाही मुलगा-मुलगी भेद मग आपण का करायचा.. असा संदेश या पाळण्याच्या माध्यमातून दिला जातो.

मुली असती कर्तृत्ववान
उंचावती गं देशाची शान
माता-पित्याला वाटे अभिमान
तिच्या जन्माचे करा स्वागत
जो बाळा जो जो रे...

असा पाळणाही या संदेशाच्या निमित्ताने तयार करण्यात आला आहे. मंत्रालयात येणारे-जाणारे प्रत्येक जण या पाळण्याजवळ येऊन थांबत होते..

दुपारच्या सुमारास आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव जे. के. बाँठीया यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लाडलीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपसंचालक विलास देशपांडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. प्रदर्शन पाहून भारावलेल्या आरोग्यमंत्र्यांनी पुढील आठवडाभर प्रदर्शन सुरू ठेवावे अशा सूचना यावेऴी दिल्या.

अजय जाधव..

No comments:

Post a Comment