Saturday, April 7, 2012

मानकरी ग्रामपंचायत..

गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत. गावाचा कायापालट करण्याची क्षमता ग्रामपंचायतीत असते. गावातील मतदारांनी ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी हे गावाच्या विकासाबाबत दूरदृष्टीने विचार करणारे निवडून दिले आणि त्यांना ग्रामस्थांनी साथ दिली तर गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. हे सिध्द करुन दाखविलं आहे ते बीड (सितेपार) च्या सरपंच, त्यांचे सहकारी,ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी. काही वर्षापूर्वी ५४ हजार ३२ रुपये कर्ज असलेली बीड ग्रामपंचायत आज लाखो रुपयांच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्यातील बीड (सितेपार ) नावाचं ११६८ लोकसंख्येचं अन् २८० कुटूंबाची वस्ती असलेलं गाव. गामपंचायतीवर असलेलं ५४ हजार रुपयाचं कर्ज. या कर्जाची परतफेड करुन गावाच्या विकासाला कशी दिशा द्यायची हा प्रश्न सरपंच देविदास बांते यांचेपुढे उभा राहीला. त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून घरपट्टी पाणी पट्टी जर ग्रामस्थांनी वेळेवर भरली तर शासनाच्या विविध योजना आपण प्रभावीपणे राबवू शकतो हे पटवून दिले.

ग्रामस्थांचा पुढाकार त्यात शासनाचा सहभाग यानुसार ग्रामस्थांच्या मदतीने गावाच्या विकासाला गती देण्याच्या कामाला सुरुवात केली. ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन व सुंदर इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. २ एकर जागेत मागास भागाच्या अनुदान निधी योजनेतून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. पूर्वी या जागेचा वापर गावकरी शेणखत टाकण्यासाठी आणि गुरे बांधण्यासाठी करीत असायचे. उकीरड्याची दशा कशी पालटते ते या जागेने सिध्द केले. ग्रामपंचायत इमारतीसमोर लॉन टाकण्यात येवून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. ग्रामपंचायत परिसरात बसण्यासाठी सिमेंटची बाकं लावण्यात आली. ग्रामपंचायती अंतर्गत व परिसरात बाहय भिंत्तीवर तसेच गावातील भिंतीवर विविध प्रकारच्या समाज प्रबोधनाचे संदेश देणारे तैलचित्र रेखाटण्यात आली. ग्रामपंचायत परिसरात सार्वभौम ग्रामसभा भवन बांधण्यात आले.

गावातील रस्त्याच्या दोन्ही कडेला वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्षांना संरक्षक कठडे बसविण्यात आली. सिसम, कडुलिंब, गुलमोहर, करंज, बकान,सुबाभुळ, आपटा अशी सावली देणारी वृक्ष लावण्यात आली. गावातील कुटूंबाना पर्यावरण संतुलीत समृध्दी गाव योजनेअंतर्गत आवळा, जांभुळ, फणस, सिताफळ व आंब्याची रोपटे भेट देवून त्यांची जोपासना गावातील कुटूंबानी योग्‍य प्रकारे केल्याचे दिसून येते.

बीड (सितेपार) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून विविध योजना प्रभावीपणे राबविल्यामुळं २००६-०७ चा केंद्राचा १ लाखाचा निर्मलग्राम पुरस्कार,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा सन २००९-१० चा जिल्हास्तरावरचा ५ लाखाचा पहिला पुरस्कार, शाहु-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेचा सन २००९-१० चा जिल्हास्तरावरचा ५ लाख पहिला पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियान सन २००९-१० चा विभागीय स्तरावरील २ लाखाचा व्दितीय पुरस्कार, गौरव ग्रामसभेचा सन २०१०-११ चा जिल्हास्तरावरचा १ लाखाचा पहिला पुरस्कार, याच स्पर्धेत विभागीय स्तरावरचा २ लाखाचा पहिला पुरस्कार, याच अभियानाचा सन २०१०-११ चा ३ लाखाचा पहिला पुरस्कार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत देखभाल दुरुस्तीचा सन २०१०-११ चा ७ लाखाचा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार, पर्यावरण संतुलीत समृध्दी गाव योजनेची सन २०१०-११ या वर्षात प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे ३ लाख रुपयांचा पर्यावरण विकास रत्न गुणगौरव पुरस्कार, तंटामुक्त गांव मोहिमेचा सन २०१०-११ चा २ लाखाचा पुरस्कार, १२ मार्च २०१२ ला राज्यपालांच्या हस्ते यशवंत पंचायतराज योजनेचा राज्यस्तरावरील ५ लाखाचा व्दितीय पुरस्कार, विभागीय स्तरावरील ३ लाखाचा पहिला पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल २ फेब्रुवारी २०१२ ला पंतप्रधानाच्या उपस्थित केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांच्या हस्ते सरपंच देवीदास बांते व सचिव निरंजना खंडाळकर यांना सन्मानित करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना व्हावी व त्‍या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा यासाठी शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचे गावातील सर्व कुटूंब सलग दुसऱ्या वर्षीही वर्गणीदार झाल्यामुळे लोकराज्यग्राम म्हणून गावाच्या सरपंच व सचिवांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

बीड (सितेपार) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मदतीतून गावाचा कायापालट केला. पूर्वी कर्जबाजारी असलेली ग्रामपंचायत आज लाखो रुपयांच्या पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. गाव करी ते राव न करी ही उक्ती ग्रामस्थांनी खरी ठरवून दाखवून दिली आहे.


  • विवेक खडसे




  • No comments:

    Post a Comment