Tuesday, April 24, 2012

सागराची साद

रविवारी सकाळी रत्नागिरीच्या मांडवी सागर किनाऱ्यावर भरतीच्या उसळणाऱ्या लाटा फेसाळत खडकांवर आदळत होत्या. समोर पसरलेल्या अथांग सागरात सूर मारून स्पर्धेचे आव्हान पेलण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले जलतरणपटू सज्ज होते. एका बाजूला हिरव्या किनाऱ्याने सजलेला विस्तीर्ण समुद्र या साहसी लेकरांबरोबर खेळण्यासाठी जणू आतूर झाला होता. निमित्त होते राष्ट्रीय सागरी दिनाचे...

देशात ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन (नॅशनल मेरीटाईम डे) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा मेरीटाईम बोर्ड आणि मिल्के अकादमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या निमित्ताने देशासाठी असणारे सागराचे महत्व लक्षात आले. सागरी क्षेत्रासंबंधी अनेक नव्या पैलूंची माहिती यानिमित्ताने मिळाली...

...भारताचा सागरी इतिहास फार प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व २३०० वर्षापूर्वी गुजरातच्या लोथल येथून तसेच सिंधुनदीच्या खोऱ्यातून पश्चिमेकडील अरब राष्ट्रांशी व्यापार झाल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतरच्या प्रत्येक कालखंडात भारतातील जहाजबांधणी उद्योगाची भरभराट झाल्याचे दिसून येते. १७ ते १९ व्या शतकात मुंबईतील जहाज बांधणी उद्योग विकसित करण्यासाठी सुरतहून पारशी कारागीरांना पाचारण करण्यात आले होते. ब्रिटीश काळात एचएमएस हिन्दोस्तान, एचएमएस सिलोन, एचएमएस एशिया, एचएमएस कॉर्नवॉलिस अशी जहाजे व्यापारासाठी उपयोगात आणली गेली.

...सागरी वाहतूकीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना निर्धारीत करण्यासाठी तसेच सागरी वाहतूकीने होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेची स्थापना (IMO) करण्यात आली आहे. या संस्थेचे प्रमुख कार्यालय लंडन येथे असून १५८ राष्ट्रांनी या संस्थेचे सदस्यत्व स्विकारले आहे. भारताने १९५९ मध्ये सदस्यत्व स्विकारले. भारताला ७ हजार ५१६ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून किनारपट्टीवर १८२ बंदरे आहेत. त्यापैकी १२ मोठी बंदरे केंद्राच्या तर ७० इतर लहान बंदरे विविध राज्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. देशातील एकूण व्यापाराच्या ९० टक्के व्यापार आणि उलाढालीच्या स्वरुपात ७७ टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. जगातील वजन वाहतूकी संदर्भात देशाचा १७ वा क्रमांक लागतो. हे लक्षात घेता सागरी संस्थेच्या कामाचे महत्व लक्षात येते. आणि म्हणूनच राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत सागरी क्षेत्र तसेच समुद्री मार्गाच्या असणाऱ्या महत्वाच्या भूमिकेवरील विश्वास प्रकट करण्यासाठी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. ५ एप्रिल १९१९ रोजी SS Loyalti या सिंधीया स्टीम नेव्हीगेशन कंपनी लि.च्या पहिल्या भारतीय जहाजाने इंग्लंडकडे प्रयाण केले होते. त्यामुळेच हा दिवस १९६४ पासून 'भारतीय सागरी दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची (महाराष्ट्र सागरी संस्था) स्थापना १९९६ मध्ये स्थापना झाल्यानंतर राज्यातही हा दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. आजची स्पर्धा हा त्याचाच एक भाग होती. रत्नागिरी जिल्ह्यात जयगड, दाभोळ या ठिकाणी बंदरांचा विकास करण्यात येत असल्याने नागरिकांसाठी सागराची साथ महत्वाची आहे. आणि सागराविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्याच्या सादेला प्रतिसाद देणाऱ्या जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीत सागरी दिनाच्या निमित्ताने सागरी जलतरण स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले होते...

...आयोजनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे समुद्रापासून दूर असणाऱ्या नागपूर, वर्धा या भागातील स्पर्धक देखील सागराची साद ऐकून आले होते. या स्पर्धकांमध्ये सहा वर्षाच्या चिमुकल्यांपासून ६३ वर्षांचे 'तरुण' जलतरणपटूदेखील होते. वयोगटाप्रमाणे स्पर्धकांना पाच, चार, तीन आणि एक किलोमीटरचे अंतर पूर्ण करायचे होते. २६३ स्पर्धकांनी हे अंतर पूर्ण केले. 'अनंत आमुची ध्येयासक्ती...' म्हणत इच्छाशक्तीच्या बळावर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या पायाने अपंग असलेल्या मोहम्मद खुदाबक्श आणि दोन्ही हाताने अपंग असलेल्या सुयश जाधव यांनी इतर स्पर्धकांनाही प्रेरित केले.

स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे पालकदेखील आले होते. रत्नागिरीचे सौंदर्य नजरेत साठविण्याची संधी या निमित्ताने मिळाल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली. माजी सैनिक शंकरराव मिल्के यांनी सतत तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात अशा आयोजनांची सांगड पर्यटनाशी घातली तर स्थानिक जलतरणपटूंना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळेल, असा विचार भाट्ये समुद्र किनाऱ्यावरचे ते वातावरण बघून मनात आला... आणि कुणी सांगावे मिल्के यांची कन्या मनिषा यांचे इंग्लिश खाडी ओलांडण्याचे स्वप्न या स्पर्धेत सहभागी एखादा स्पर्धक पुढे पूर्ण करेल.

  • डॉ.किरण मोघे
  • No comments:

    Post a Comment