Saturday, April 7, 2012

बचतगटाचा मत्स्यपालनाचा उपक्रम

राज्‍यामध्‍ये महिला बचतगटाच्या चळवळीने व्‍यापक स्‍वरुप धारण केले आहे. बचतगटाच्‍या महिला लोणची-पापड, मसाले या पारंपरिक उत्‍पादनाऐवजी नव-नवीन स्रोतांचा शोध घेऊन सक्षमीकरणाच्‍या दिशेने वाटचाल करीत आहेत. परभणी जिल्‍ह्यातही बचतगट चळवळीने चांगलीच उभारी घेतल्‍याचे दिसून येत आहे. पूर्णा तालुक्‍यातील मजलापूर या गावात मत्‍स्यपालनाचा उपक्रम राबवून रमाई महिला बचतगटाने वेगळा आदर्श घालून दिला आहे.

मजलापूरमध्ये बचतगटाविषयी महिलांना कोणतेही अप्रूप नव्‍हते. महिलांनी एकत्र येऊन दरमहा निश्‍चित अशी रक्‍कम बचत करायची, त्‍यातून एकमेकींना कर्ज स्‍वरुपात रक्‍कम देऊन गरजा भागवायच्‍या. पैसा उपलब्‍ध झाला की कर्ज फेडायचे. हा विचार पटणे अवघडच झाले होते. भिशीच्‍या माध्‍यमातून झालेली आर्थिक फसवणूक कानावर आलेली असल्‍याने महिलांची एकत्र येण्‍याची हिम्‍मत नव्‍हती. शासनाच्‍या महिला बचतगटाच्‍या योजनेविषयी माहिती मिळाल्‍यावरही त्‍यांची एकत्र येण्‍याची तयारी नव्‍हती. जमा केलेली रक्‍कम चोरी झाली किंवा एखादीने अपहार केला तर काय, असा प्रश्‍न त्‍यांच्‍या मनात यायचा. तथापि सातत्‍याने पाठपुरावा झाल्‍यावर आणि बचतगटाच्या माध्यमातून होणारे फायदे लक्षात आणून दिल्यावर हळूहळू त्यांचे मत परिवर्तन होऊ लागले आणि १७ फेब्रुवारी २००६ मध्‍ये रमाई महिला स्‍वयंसहायता बचतगटाची स्‍थापना झाली.

अपेक्षेप्रमाणे गटातील महिलांनी दरमहा बचत सुरु केली. प्रारंभी परस्‍पर विश्‍वास नसल्‍याने सुमारे पाच महिने कोणताही व्‍यवहार केला गेला नाही. परंतु नियमित एकत्र आल्‍यामुळे महिलांना एकमेकींविषयी आपुलकी निर्माण होऊ लागली. स्‍नेह संबंध निर्माण होऊ लागले. त्यानंतर ऑगस्‍ट २००६ पासून अंतर्गत कर्ज व्‍यवहार सुरु झाले. मराठवाडा ग्रामीण बँकेने २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्‍ध करुन दिले. गावाजवळच पाण्‍याचे तळे होते. मिळालेल्या पैशातून महिलांनी या तळ्यात मत्‍स्य व्‍यवसाय करायचे ठरवले.

काही दिवसांनंतर गटातील महिलांनी गावातील विविध उपक्रमांमध्येही भाग घेण्यास सुरूवात केली. त्यांचे गावात विविध उपक्रम चालत असल्‍यामुळे गावकऱ्यांनाही बचतगटाच्‍या कार्याविषयी माहिती होऊ लागली. सरपंच व ग्रामसेवकांनी महिलांच्‍या मत्‍स्यशेतीच्‍या निर्णयाचे स्‍वागत केले आणि बचतगटास एका वर्षासाठी तळे देण्‍यास मंजूरी दिली.

महिलांनी कटला, सिपलस, रोहू या जातीचे २० डब्‍बे मत्‍स्‍यबीज खरेदी करुन तळ्यात सोडले. नियमित निगरानी केल्‍याने माशांची पैदास वाढली. गावामध्‍ये तसेच तालुक्‍याच्‍या ठिकाणी महिलांनी मासे विक्री केली. मासे विक्री व्‍यवसायातून गटाचे भांडवल व आर्थिक व्‍यवहार १ लाख ५० हजार ४०० रुपये इतका झाला. आर्थिक फायदा झाल्‍यावर वंदनाबाई गायकवाड व लक्ष्मीबाई टोटे यांनी सिमेंट गट्टू तयार करण्‍याचा व्‍यवसाय सुरु केला. सिताबाई गायकवाड, वेणूबाई शिवभगत व इतर महिलांनी शेळीपालन, म्‍हैस पालन व गांडूळ खत निर्मिती व विक्री सुरु केली. आर्थिकदृष्‍ट्या सक्षमीकरण झाल्‍याने महिलांमध्ये आत्‍मविश्‍वास निर्माण झाला. आता सामाजिक उपक्रमात बचतगटाच्‍या महिला हिरीरीने सहभागी होऊन समाजाच्‍या ऋणातून उतराई होण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत.

  • राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, परभणी

  • No comments:

    Post a Comment