Wednesday, April 11, 2012

सामना वणव्याशी आणि जंगलाच्या संवर्धनाशी

जंगलांना उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात समृध्द वनाची तसेच जैवविविधतेची हानी होते. दरवर्षी मार्च ते जून हा कालावधी आग हंगाम म्हणून ओळखला जातो. तीव्र उन्हाळा, पानगळीचे जंगल तसेच वनक्षेत्रात साचलेल्या शुष्क पालापाचोळ्यामुळै वनांचे संपूर्ण क्षेत्र आग प्रवण क्षेत्र ठरते.

वणव्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर त्याचा परिणाम होत असतानाच हा वणवा जंगलाच्या शेजारी असलेल्या गावांसाठीही धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे जंगलातील वणवा नियंत्रणासाठी स्थानिक जनतेचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. वणव्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच पण मोठ्या संकटालाही सामोरे जावे लागते. यासाठी वनविभागाने आग प्रतिबंधक उपायायोजना मोठ्या प्रमाणात सुरु केल्या आहेत. यासाठी आधुनिक तंत्राचाही वापरावर विशेष भर देण्यात येत आहे.

मेळघाटची भौगोलिक परिस्थिती आणि तीव्र उन्हाळा, पानगळीचे जंगल यामुळे आगी लागण्याचे प्रमाण अधिक असले तरी वणवा प्रतिबंध उपायोजनेंतर्गत करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार दरवर्षी जाड रेषा तयार केली जाते. या जाड रेषेमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यासोबतच जंगलात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्याची त्वरित माहिती व्हावी यासाठी आग निरिक्षण मनोरे उभारण्यात आले असून आगेची माहिती मिळताच आग संरक्षण दल तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. जंगलामध्ये नियमित गस्त करणे, वनक्षेत्रातील गावामध्ये आग संरक्षण समिती स्थापन करुन त्यांचे मदतीने संयुक्त गस्त करुन आग नियंत्रण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

वनक्षेत्रामध्ये संपर्कासाठी बिनतारी संदेश यंत्रणा उपयुक्त असल्यामुळे उन्हाळ्यात ती सज्ज ठेऊन संपर्क सेवा वाढविण्यावर विशेष भर देण्यात आली आहे. जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर आगीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतची माहिती प्रसिध्द केल्यामुळे आगीची तीव्रता व त्यामुळे होणारे नुकसान जनतेलाही सहज उपलब्ध झाल्यामुळे जनतेचे सहकार्य मिळविणे सहज शक्य होऊ शकते. वनक्षेत्रातील गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करुन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगल वाचविण्यासाठी आग नियंत्रणाची आवश्यकता व उपाययोजना याबाबत माहिती देऊन नागरिकांनाही सज्ज ठेवण्यात येते.

जंगलामध्ये आगी तीव्र उन्हाळ्यामध्ये तर लागतात परंतु जंगल क्षेत्रात राहणारे गावकरी रात्री एका गावातून दुसऱ्या गावात जाताना धुदरी (मशाल) घेऊन जातात. हवेच्या तीव्रतेमुळे मशालीमधील आग जंगलांना लागून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. तसेच याच काळात मोह फुलांचा हंगाम असल्यामुळे मोहफुले गोळा करताना सोईचे व्हावे म्हणून या झाडाखाली आग लावली जाते. त्यामुळे मोहफूल वेचणे सुलभ व्हावे हा एकमेव उद्देश असतो. परंतु ही आग पसरत जाऊन मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान होते. जंगला शेजारी शेती आणि शेतीमधील साफ सफाई करताना स्थानिक शेतकरी आग लावतात. ती पसरल्यामुळे जंगल क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो.

काही लोक व्देषभावनेतून सुध्दा आगी लावतात. एकदा आग लागली की वाळलेले गवत, पालापाचोळा व जंगलाची भौगोलिक रचना यामुळे ही आग त्वरित पसरते व वेळीच उपाययोजना केल्या नाही तर काही तासात या दूरवर पसरते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जंगलामध्ये तयार करण्यात आलेल्या संरक्षण कुटीवरील मजुरांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होते. या काळात मजुरांची संख्याही वाढविण्यात येऊन वनांच्या संवर्धनाचे काम वनविभागातर्फे सुरु आहे.

सामना वणव्याशी आणि जंगलाच्या संवर्धनाशी. . . . .

वनविभागासोबतच संयुक्त वनविभाग स्थापन धोरणांतर्गत वन शेजारील सर्व गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून उन्हाळ्यातील आग हंगाम लक्षात घेऊन कुऱ्हाड बंदी, चराई बंदी व आग नियंत्रण याबाबत प्रबोधन करण्यात येते. त्यामुळे आगीच्या घटना कमी होण्यास मदत होते.

वन व वन्यजीवांचा विकास करावयाचा असेल तर स्थानिक लोकांच्या जंगलावर आधारित असलेल्या गरजा सीमित करणे, त्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करणे व त्यांना उदरनिर्वाहाच्या शास्वत संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठीच ग्राम परिसर, निसर्ग पर्यटनाचे धोरणाची अंमलबाजावधीसाठी पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये स्थानिक ग्राम परिसर विकास समिती ही मुख्य लाभार्थी राहणार आहे.

मेळघाट परिसरात मर्यादित स्वरुपाच्या निसर्ग पर्यटनास वाव असुन स्थानिक लोकांच्या सर्वागिण विकासासाठी तसेच वन व वन्यजीव संवर्धनासाठी निसर्ग पर्यटन महत्वाची भुमिका बजावू शकते. येथील आदिवासींच्या क्षमता विकसित करण्यासाठी नुकतीच सेमाडोह येथे कार्यशाळा घेण्यात आली होती. स्थानिक आदिवासींच्या सहभागाने पर्यटनासोबतच वन संवर्धन, निसर्ग पर्यटन तसेच जंगलांच्या संवर्धनासाठीही महत्वपूर्ण योगदान राहणार आहे.

उन्हाळ्यातील जंगलांना आगीच्या संरक्षणापासुन वाचविण्यासाठी स्थानिक जनतेचे महत्वपुर्ण योगदान राहीले असुन त्यांच्या सहकार्याने मेळघाटची समृध्द वनसंपदा जतन करणे शक्य होत असल्याचेही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक अशोककुमार मिश्रा यांनी सांगितले.


  • अनिल गडेकर

  • No comments:

    Post a Comment