Wednesday, April 18, 2012

जोडधंद्यातून गाव समृध्दीचा ध्यास

गावच्या व नागरिकांच्या स्वच्छतेनंतर शेतीची स्वच्छता करण्यासाठी बुलडाणा जिल्हयाच्या संग्रामपूर तालुक्याच्या निरोड ग्रामस्थांनी सेंद्रीय शेती व व्यावसायिकतेचे पाऊल उचलले आहे. ही किमया स्वच्छता अभियानातून साधल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. एस ९ कल्चरचा वापर करुन शेणाचे कंपोस्टींग करण्याचा प्रयोग येथे सुरु झाला आहे.आता रासायनिक खताचा वापर कमी करुन कंपोस्ट खताचा वापर वाढावा यासाठी येथिल ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

गावात स्वच्छतेचा मूलमंत्र गुंजत असताना गावाची, शरीराची स्वच्छता करणे याबरोबरच आर्थिकतेचा डोलारा असलेल्या शेती व्यवसायाचे आरोग्य सुदृढ व्हावे. यासाठी यामध्ये स्वच्छतेचा मार्ग अवलंबून निरोडवासियांनी कमी खर्चात उत्पादन घेणे व जोडधंदे सुरु केंले . गावातील शेणखताचे उकिरडे गावाबाहेर नेवून त्या शेणाच्या गंजावर एस-नाईन-कल्चरचा वापर करुन डी कंपोस्ट खत निर्मितीचा ध्यास घेतला आहे.

या गावातील जमिनीची पोत ही क्षारपड असल्याने खर्चाच्या हिशेबाने उत्पादन होत नाही. पर्यायाने उत्पादनात भर पडण्याऐवजी घट होत आहे. मात्र स्वच्छता अभियानाचे माध्यमातून ही नवी दिशा येथील शेतकऱ्यांसमोर आली . एवढेच नाही तर गावातील महिला बचतगटाचे वतीने शेती जोडधंदे उभारणीस सुरुवात झाली आहे. १३ बचतगटांपैकी ७ बचतगट या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्यामध्ये काही बचतगटांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. तर एका बचतगटाने ईमू पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. गावात स्वच्छता अभियान सुरु झाल्याने विविध विभागाचे अधिकारी भेटी देत आहेत. यातून वेगवेगळे उपक्रम समोर येत आहेत.

विकासाचे दृष्टीने एकाच गोष्टीवर अवलंबून राहणे सोयीस्कर नाही. त्यासाठी नवनवे प्रयोग व बदल आवश्यक असतात. त्यानुसार निरोड गावात स्वच्छतेसोबतच शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन मिळत आहेत. गावात अभियानाचे रुपाने दारुबंदी, गुटखाबंदी झाली. परिणामी यावर व्यर्थ खर्च होणारा पैसा बरेच प्रमाणात वाचविता येणार आहे. गावाच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. भूगर्भातील पाण्याचे प्रमाण वाढीसाठीचे विविध कार्यक्रम श्रमदानाचे माध्यमातून राबवून गावाचा कायापालट करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment