Wednesday, April 18, 2012

शिल्पसमृध्दीचा आविष्कार

अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण होत होती... समोर उभी असलेली कोपेश्वर मंदिराची अप्रतिम कलाकृती डोळ्यांचे पारणे फेडत होती वाह.......छान....... सुंदर...... अप्रतिम.... हे सारेच शब्द या शिल्पाकृतीच्या समर्पक वर्णनासाठी किती थिटे आहेत याची खात्री मला मनोमन पटत होती. कोल्हापूर पासून केवळ ६०- ६५ किलोमीटर वर असणारं शिरोळ तालुक्यातलं खिद्रापूर कृष्णाकाठावरलं सर्वात सुंदर लेणं घेऊन नव्हे तर लेवून शांतपणे माझ्यासमोर उभं होतं. कोपेश्वराच्या मंदिरातली आणि मंदिराबाहेरची शांतताच निरव, गहन, गंभीर स्वर उच्चरवाने आळवत होती. आणि आज्ञाधारक श्रावकासारखा मी ही तल्लीन होऊन ते स्वर ऐकत होते.

नागमोडी वळणं घेत कृष्णानदी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाते. नृसिंहवाडी जवळ तिला पंचगंगा भेटते. तिथून पुढं अगदी १५ कि.मी. वरच खिद्रापूर गाव कृष्णाकाठावर वसलं आहे. गावच्या तीनही बाजुला नदी आहे. या नदीच्या किनाऱ्यावर उभा आहे कोपेश्वर! वळणावळणाचा रस्ता कापत खिद्रापूरला आमची गाडी जात होती. कृष्णाकाठचा संपूर्ण परिसर सुपीक. सगळीकडे जोमानं डौलणारा हिरवागार ऊस आणि या उंचपुऱ्या ऊसाला अंगावर खेळवणारी काळीभोर माती.

काळ्या कातळाचा कुठं पत्ताच नाही. त्यामुळंच समोर उभं असलेल नितळ, चमकदार काळ्या दगडातील अद्भूत असं कोपेश्वराचं मंदिर बघताना पहिला विचार मनात आला तो हा महाकाय पाषाण इथं आला कसा ? साधं घर बांधायचं म्हटलं तरी १० - १२ फुटांशिवाय इथं मुरुमही लागत नाही तिथं हे पाषाणफूल फूललचं कसं ! पण जसजसे मंदिराच्या प्रवेशातून आत जाऊ लागले तशी माझ्या कुतूहलाची जागा जिज्ञासेने घेतली. सुमारे दीड हजार वर्षापूर्वीचे हे पुरातन, भव्य मंदिर म्हणजे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा अद्वितीय संगम आहे. त्याचा आस्वाद घेत असताना खरं तर मी माझी राहिलेच नाही...

कोपेश्वर हे शंकराचेच एक नाव. शंकराच्या मंदिराचे सर्वमान्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दारातील नंदी. पण या मंदिराच्या दारात नंदीच नाही. आख्यायिकेनुसार प्रजापती दक्षकडे सतीसोबत शंकराने नंदीला पाठविल्याने या ठिकाणी नंदी नाही, असे सांगितले जाते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर शिवलिंगापेक्षा थोडी जास्त उंच असणारी शाळुंखा म्हणजेच विष्णूची प्रतिकात्मक प्रतिमा नजरेस पडते. कोपेश्वर मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे सभामंडपाला लागून असणारा स्वर्ग मंडप. स्वर्ग मंडपाबाहेर २४ हत्तींची मांडणी आहे. या स्वर्गमंडपाला २८ खांब असून चार दिशांना प्रवेशद्वारे आहेत. आकाशाच्या दिशेने १३ फूट व्यासाचे गवाक्ष आहे. त्याच्या बरोबर खाली त्याच मापाची उखंड दगडी शिळा आहे. या शिळेभोवती १२ खांब आहेत. या खांबावर सुंदर नक्षीकाम केले आहे. या खाबांच्या माथ्यावर दिशा देवताही आहेत.

स्वर्गमंडपाची रचना ही प्रमाणबध्द गोलाकार वर्तुळाकृती आहे. लाकडी तुळ्यांप्रमाणे कोरीव काम दगडी तुळ्यांवर केले आहे. मध्य भागातील गोलाकृती शिळेभोवती पहिल्या मालिकेत पूर्ण उंचीचे १२ खांब आहेत. दुसऱ्या मालिकेत १६ तर तिसऱ्या मालिकेत ओवरीवर १२ आणि चौथ्या मालिकेत ओवरीवरच आठ खांब आहेत. खांबाची कोपेश्वराच्या मंदिराच्या बाहेरील बाजूने देव-देवतांची, स्त्री पुरुषांच्या शिल्पाची पट्टी कोरलेली दिसते. तिला नरपट्ट म्हणतात. यावरील शिल्पकृती अनन्य साधारण आहे.

स्त्री- पुरुषांच्या चेहऱ्यावरील भाव दगडातही जसेच्या तसे प्रकटले आहेत. नरपट्टयाच्या खालील बाजूस गजपट्टा आहे. यावर प्राण्यांची विविध आकारातील शिल्प, फुले, फळे, नखशिखांत आभूषणांनी नटलेल्या युवतींची विविध पेहरावतील शिल्पे कोरली आहेत. सभा मंडपाला तीन प्रवेशद्वारे आहेत. पहिले प्रवेशद्वार स्वर्ग मंडपातून आहे. त्याचा भक्कमपणा व भव्यता भारुन टाकते. त्या चौकटीवर मध्यभागी शक्ती देवता असून उंबऱ्याला लागून प्रत्येक बाजुला पाच गदाधारी द्वारपालांची ओळ आहे.

दक्षिण दारावरील चौकटीवर गणेशाचे शिल्प असून दोन्ही बाजूला सात स्त्री द्वारपाल व तीन पुरुष द्वारपाल आहेत. उत्तर बाजूच्या चौकटीवर शिल्प नाही. खाली प्रत्येकी पाच द्वारपालांची ओळ असून त्यांच्या हातात पूजा सामग्री आहे. स्वर्ग मंडपात जशी गोल शिळाआहे तशीच लहान पण वर्तुळाकार शिळा सभामंडपाच्या चौकोनी कठड्यावर आहे. स्वर्गमंडपाची रचना वर्तुळाकृती आहे. एकूण खांबांची संख्या ६० आहे. स्वर्ग मंडप व गाभारा यांच्या दरम्यान अंतराळगृह आहे. याच्या प्रवेश द्वाराजवळ आठ फुट उंचीचा द्वारपाल आहे.

स्वर्ग मंडप, सभा मंडप अंतराळ गृह व गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी अंगभूत योजना आहे. या ठिकाणी १८ शिलालेख आहेत. देवगिरीचे यादव नृपती सिंहाण यांनी देवळाचा जीर्णोध्दार केल्याचे यावरुन दिसून येते.

संपूर्ण मंदिर पाहून संपले तरी मन भरत नव्हते आणि तिथून पाय निघत नव्हता.पुन्हा पुन्हा मन त्या अनामिक कलाकरांना सलाम करत होते की ज्यांनी आपल्या नावाची साधी निशानीही कोठे ठेवलेली नाही. कोल्हापूर जिल्हातील हे अनोखे मंदिर पर्यटन स्थळ ठरले आहेच. पण विदेशातील पर्यटकांचा येथे ओघ वाढत आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून यांची देखभाल केले जाते. मंदिराच्या निर्मिती व शिल्प शैलीचे अभ्यासक श्री. रामचंद्र गोविंद चोथे यांची भेट झाली. मंदिराच्या शिल्पसमृध्दीचे अनेक पैलूचे आकलन होण्यास विशेष मदत झाली.


  • वर्षा पाटोळे

  • No comments:

    Post a Comment